

सातारा : जिल्ह्यातील अजिंक्यतारा साखर कारखाना वगळता अन्य कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्याने त्या-त्या कारखान्यांशी करार संपलेल्या ऊसतोड मजुरांची पावले गावाकडे वळू लागली आहेत. महामार्गावरही ऊसतोड मजुरांना घेवून जाणारी वाहने धावत आहेत. अनेकजण त्यांच्या गावी पोहचलेही आहेत. त्यामुळे गजबजलेली माळरानं ओस पडली असून त्यांच्या खोपटाच्या खुणा उरल्या आहेत. उर्वरित ऊसतोड मजुरांमध्ये गावाची ओढ वाढली असून कधी गाळप हंगाम संपतो याची प्रतीक्षा लागली आहे.
नगदी उत्पादन देणारे पीक म्हणून बागायती पट्ट्यात ऊस लागवडीकडे पाहिले जाते. त्यामुळे जिल्ह्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातील मजूर जिल्ह्यात येतात. विविध साखर कारखान्यांचे ऊसतोड कामगार एकाच ठिकाणी गावाबाहेरील मोकळी मैदाने, माळरानावर राहतात. वेगवेगळ्या कारखान्यांसाठी ऊसतोड करत असले तरी सुमारे तीन ते चार महिने एकाच परिसरात राहत असल्याने गाठीभेटी, संवाद होतो. तसेच या मजुरांच्या राहुट्यांमुळे माळरानं गजबजून जातात. मात्र, सध्या सातारा शहरानीजकचा अजिंक्य साखर कारखाना वगळता जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. त्यामुळे या ऊसतोड कामगारांचे बहुतांश शेजारी गावाकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या खोपटाच्या जागेवर जुने निकामी साहित्य, फाटकी कपडे, चुलीसाठी गोळा केलेली दगड व विटा, फरशांचे तुकडे त्यांच्या वास्तव्याचा पुरावा देत आहेत.
काही मजूर अद्यापही ऊसतोड करत आहेत, त्यांचेही काम लवकरच संपणार असल्याने या मजुरांना गावची ओढ वाढली आहे. नातेवाईक शेजारी गावी पोहचल्याने गावची हालहवा फोनद्वारे कळवत आहेत. या संवादातूनच मनाने गावकडे धाव घेतली आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून अनेकांनी सामानाची बांधाबांधही केली आहे.