

सातारा : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला दिलेल्या सवलती, प्रोत्साहन व अनुदानामुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे मोर्चा वळवला आहे. गत हंगामात सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी तब्बल २० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती केली आहे. यामुळे कारखान्यांचे अर्थकारण सुधारले आहे. इथेनॉलची लवकर होणारी विक्री, लगेच मिळणारे पैसे यामुळे कारखाने डिस्टलरींचा विस्तार करत आहेत. यामुळे आता साखर कारखाने साखरेसोबत इंधनातही वाटा उचलत आहेत.
जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत एकूण सुमारे १.९६ लाख किलो लिटर म्हणजेच सुमारे २० कोटी इथेनॉलचे उत्पादन केले. यामध्ये स्वराजने सर्वाधिक ७७,३०८ किलो लिटर उत्पादन केले असून दत्त इंडियाने ३६,८१७, जरंडेश्वरने ३६,७९३, सह्याद्रीने १५,१९०, खटाव-माण अॅग्रोने १२,२२९, शरयू ॲग्रोनेे ६,०७५ आणि अजिंक्यताराने ५,९०५ किलो लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. जयवंत शुगरने ३,६५५, तर यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याने १,०९० किलो लिटर उत्पादन केले.
इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडून डिस्टिलरी प्रकल्पांच्या विस्ताराचे नियोजन सुरू आहे. अजिंक्यतारा कारखान्याचे डिस्टिलरीची क्षमता ३० केएलपीडीवरून ६० केएलपीडी करण्याचे नियोजन आहे. सह्याद्री कारखान्यावर १४५ केएलपीडी क्षमतेची डिस्टिलरी आहे.
कृष्णा कारखान्याची १४२ केएलपीडी क्षमतेची डिस्टिलरी असून त्यातील ८० केएलपीडी क्षमता इथेनॉल निर्मितीसाठी आहे. स्वराजची तब्बल ५०० केएलपीडी क्षमतेची डिस्टिलरी आहे. येथे मळीबरोबरच मका व धान्याधारित फीडस्टॉकचा वापर केला जातो. याशिवाय दत्त इंडिया कारखान्याये १०५ केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरीचा प्रस्ताव दिला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे ९० एलपीडी डिस्टलरी उभारण्याचे नियोजन केले आहे.