

सातारा : जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर तक्रार निवारण फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. खते लिंक करणे, खरेदी पावती नेणे, खते देण्यास टाळाटाळ करणे, असे प्रकार करणार्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी बारा भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शेतकर्यांच्या सोयीसाठी संबंधित कृषी सेवा केंद्रांवर तक्रार निवारण फलक लावण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकर्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण खत पुरवठा होण्याच्यादृष्टीने विविध योजना व अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकर्यांची फसवणूक व लूट होऊ नये यासाठी जिल्ह्यामध्ये कृषी विभागामार्फत बारा भरारी पथकांमार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात येते.
खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांसाठी तक्रार निवारण फलकाचे प्रारूप देण्यात आले आहे. या कृषी निविष्ठा तक्रार निवारण फलकावर शेतकरी विविध प्रकारे तक्रार नोंदवू शकतात. शेतकर्यांना या फलकावर दिलेल्या 9822446655 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे तक्रार नोंदवता येते. तसेच 7498921284 या मोबाईल क्रमांकावर फोन करून शेतकरी कृषी सेवा केंद्राशी संपर्क करू शकतात.
तसेच क्युआर कोड स्कॅन करून त्यावर येणारा गुगल फॉर्म भरूनही शेतकर्यांना तक्रार दाखल करता येणार आहे. कृषीनिविष्ठा केंद्रावर खतासोबत इतर कृषी वस्तू किंवा खते खरेदीसाठी सक्ती (लिकिंग) करणे, खते देण्यास टाळाटाळ करणे, खरेदीची पावती देण्यास नकार देणे किंवा गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास शेतकर्यांना तक्रार करता येईल. शेतकर्यांच्या तक्रारीचे निराकरण कृषी विभागामार्फत केले जाणार आहे.
खरेदीची पक्की पावती घ्यावी. तसेच शेतकर्यांनी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून खते खरेदी करावीत. शेतकर्यांची फसवणूक व नुकसान टाळण्यासाठी विनापरवाना कोणी बियाणे, खते व किटकनाशक विक्री किंवा निर्मिती करत असल्यास कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.