Satara stormy rain: वादळी पावसाने हाहाकार; घरांची पडझड

अनेकांचे संसार उघड्यावर : वीज कोसळून गाय व 18 बकऱ्या ठार
Satara stormy rain: वादळी पावसाने हाहाकार; घरांची पडझड
Published on
Updated on

सातारा : वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसाने सातारा शहर व परिसरासह जिल्ह्यात हाहाकार उडाला. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष उन्मळून पडले, तर अनेक घरांची पडझड झाली. लक्ष्मी टेकडी सदरबझार परिसरात, वडार वस्तीत घरांवरील पत्रे वादळात उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. कोंडवे येथे वीज कोसळून 18 बकऱ्या तर पेडगाव (ता. खटाव) येथे एक गाय ठार झाली.

विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले. सातारा शहरात सिव्हिल रोडवरील झाडांच्या फांद्या, सर्किट हाऊस जवळील बोर्ड पडले. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, उड्डाणपुलाखाली पाणी साठल्याने वाहनधारक अडकून पडले होते. शिवराज पेट्रोल पंप ते वाढे फाटा दरम्यान महामार्गावर विविध प्रकारच्या केबल पडल्या होत्या. खेड-चाहूर परिसरात ॲथर शोरूमजवळ सेवा रस्त्यावर झाड पडले. नवीन महाडा कॉलनीत दोन झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला. वडारवस्ती, सदरबझार येथे विजेचा पोल घरांवर कोसळल्याने नुकसान झाले.

आरटीओ कार्यालयाच्या मागील रस्त्यावर वीज वाहक तारा पडल्याने खळबळ उडाली. लक्ष्मी टेकडी परिसरातील 12 ते 13 घरांवरील पत्रे उडाले. नगरपालिका कर्मचारी वसाहतीमधील पत्रे उडून सुमारे पाचशे फूट दूर लक्ष्मी टेकडी वस्तीत पडले. या पडझडीमुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी आश्रयासाठी धावले. कोंडवे येथील चोरगे मळा शिवारात 18 बकऱ्या दगावल्याने मेंढपाळाचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले. चिंचणेर निंब, येथे नदीवरील पुलावर बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.

सातारा शहरात फिरते विक्रेते, भाजी व फळविक्रेते यांची धांदल उडाली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी दुकाने, टपऱ्यांमध्ये आश्रय घेतला. शहरातील सर्व रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. पावसाच्या जोरदार सरींसह अधून मधून होणारा विजांचा कडकडाट काळजाचा ठोका चुकवत होता. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांना दिलासा मिळाला.

ग्रामीण भागात सध्या आले, हळद लागवड तसेच आगाप पेरणी झालेल्या उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे. तसेच उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. अवकाळी पावसामुळे या कामांमध्ये अडथळा आला. काही ठिकाणी मशागतीची वाहने शेतातच अडकून पडली. सध्या हंगामी देशी आंबा पक्व झाला असून, वादळी वाऱ्यामुळे त्याचे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news