

सातारा : गत आठवड्यापासून तापमानाचा पारा चढल्याने अवकाळी पावसाचे सावट जिल्ह्यात घोंगावत होते. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सातारा शहर, तालुक्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली. घरांवरील पत्रे उडून नुकसानही झालेे.
काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत असून अधून मधून येणारे ढगाळ हवामान होते. बुधवारी सायंकाळी सुमारे अर्धातास सातारा तालुक्यासह जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या सातारकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
शहरात कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी पावसात दुकाने, टपऱ्यांच्या आडोशाला आधार घेतला. भाजी विक्रेते, हंगामी व्यावसायिकांची मात्र त्रेधा उडाली. पाटखळ, लिंब, कण्हेर आणि परिसरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरांवरील पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.