

सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील मेढा आगार व बसस्थानकाचे शनिवारी सुरक्षा ऑडिट महामंडळाच्या सुरक्षा यंत्रणेसह अन्य अधिकार्यांमार्फत सुरू करण्यात आले आहे. रविवारी सातारा बसस्थानकाचे सुरक्षा ऑडिट केले जाणार आहे.
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या सर्व विभागातील अधिकार्यांची बैठक घेवून सर्व बसस्थानक व आगारांचे सुरक्षा ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा विभागातील सर्व बसस्थानकाच्या सुरक्षा ऑडिटचे काम सुरक्षा यंत्रणेमार्फत हाती घेण्यात आले आहे. शनिवारी मेढा येथील आगार व बसस्थानकाचे ऑडीट करण्यात आले. यामध्ये बसस्थानकाचे क्षेत्रफळ, सीमा सुरक्षा भिंत उंची व विस्तार, दैनिक प्रवासी संख्या, दररोज बसेसच्या फेर्या, रात्र मुक्काम बसेसची संख्या, सुरक्षा रक्षकांची संख्या, पोलिस चौकी आहे का? 24 तास पोलिस उपलब्ध असतात का? सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या, सीसीटीव्हीमध्ये न येणार्या ब्लॅक स्पॉटची संख्या यासह अन्य माहिती या सुरक्षा ऑडिटच्यावेळी घेण्यात येत आहे. यासाठी स्थानिक पोलिस व एसटी प्रशासन, सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी काम करत आहेत. सुरक्षा ऑडिटमध्ये प्रामुख्याने प्रवाशी सुरक्षितता, स्थानकात पुरेशी प्रकाश व्यवस्था आहे का? सुरक्षारक्षक नेमणूक करण्याची ठिकाणे, उभ्या केल्या जाणार्या बसेस, महिला सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक, चौकशी कक्षात महिला अधिकार्यांची नेमणूक आदी गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात येत आहे.