ST NCMC Card : एसटीच्या एनसीएमसी कार्ड रिचार्जमध्येही ‘घोळ’

एकाच रकमेच्या रिचार्जसाठी वेगवेगळी कपात ; वाढील रकमेबाबत प्रवाशांच्या मनात संभ्रम
ST NCMC Card
ST NCMC Card
Published on
Updated on
अशोक मोहने

कराड : एसटी महामंडळाच्या विविध सवलतींसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एनसीएमसी कार्डच्या रिचार्ज प्रक्रियेतही शुल्ककपातीचा गोंधळ समोर आला आहे. एकाच रकमेचा रिचार्ज वाहकाकडे केल्यास तुलनेने कमी, तर अधिकृत कार्ड एजंटकडे केल्यास मोठ्या प्रमाणात शुल्ककपात होत असल्याने प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. जादा रक्कम नेमकी कोणाच्या खात्यात जाते, याबाबत स्पष्टता नसल्याने एसटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एनसीएमसी कार्ड रिचार्जसाठी एसटी प्रशासनाने बसस्थानके तसेच आगारांमध्ये अतिरिक्त वाहकांची व्यवस्था केली आहे. बसमधील किंवा बसस्थानकावरील वाहक तसेच कार्ड एजंटकडे ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सुविधा आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी जीएसटी आणि शुल्काच्या नावाखाली होणारी कपात वेगवेगळी असल्याचे रिचार्जच्या आकडेवारीवरून दिसून येते.

उदाहरणार्थ, १०० रुपयांचा रिचार्ज वाहकाकडे केल्यास कार्डवर ९८.९४ रुपये जमा होतात. यामध्ये जीएसटी १६ पैसे आणि लागू शुल्क ९० पैसे कपात होते. त्याचवेळी हाच १०० रुपयांचा रिचार्ज एजंटकडे केल्यास कार्डवर केवळ ८७.१४ रुपये जमा होतात. यामध्ये जीएसटी १.९६ रुपये आणि तब्बल १०.९० रुपये सुविधा शुल्क आकारले जाते.

रिचार्जची रक्कम वाढत गेल्यानंतर ही तफावत आणखी वाढत जाते. वाहकाच्या मशीनवर ‘लागू शुल्क’, तर एजंटच्या मशीनवर ‘सुविधा शुल्क’ असा स्वतंत्र पर्याय दिसत आहे. परिणामी, कमी शुल्क लागणाऱ्या वाहकांकडे रिचार्ज करण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढत आहे. दरम्यान, एनसीएमसी कार्ड एजंटांनाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे. नवीन अपडेटची पुरेशी माहिती कंपनीकडून मिळत नसणे, सर्व्हर डाऊन होणे, पेमेंट अडकणे तसेच अडचणी निर्माण झाल्यानंतर अधिकृत प्रतिनिधींकडून प्रतिसाद न मिळणे, अशा समस्या एजंटांनी मांडल्या आहेत.

कार्ड रिचार्जच्या शुल्कात एवढी तफावत का, याचे एसटी महामंडळ आणि संबंधित कंपनीने स्पष्ट स्पष्टीकरण देण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. एकाच कार्डासाठी एकाच रकमेचा रिचार्ज करताना प्रवाशांकडून वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याने प्रवाशांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक कार्डची गरज नव्हती असे मत व्यक्त होत आहे.

प्रवाशांना नेमका किती फटका?

₹१०० रिचार्ज — वाहकाकडे : ₹९८.९४ जमा

₹१०० रिचार्ज — एजंटकडे : ₹८७.१४ जमा

फरक : ₹११.८०

एजंटकडील रिचार्जमध्ये ₹१०.९० सुविधा शुल्क, तर वाहकाकडे ₹०.९० लागू शुल्क.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news