

सातारा : सातारा शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या सातारा बसस्थानकाच्या जून्या इमारतीवर आता बुलडोझरचा हातोडा पडू लागला आहे त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त झाली आहे. कालांतराने जीर्ण झालेली आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत अपुरी पडणारी जुनी इमारत हटवून त्याठिकाणी आधुनिक सुसज्ज बसस्थानकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
सातारा बसस्थानक हे पुणे बंगलोर महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जातेे. या ठिकाणी पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोकण, बेळगाव, कर्नाटकसह राज्यभरात हजारो एसटी बसेस ये-जा करत असतात. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. बसस्थानकाची वास्तू जीर्ण झाली होती. नव्याने बसस्थानक बांधण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रूपयांचा निधीही मंजूर झाला आहे.
मात्र गेल्या काही दिवसापासून बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी इमारतीच्या सभोवताली पत्राही लावण्यात आला आहे. बऱ्यापैकी इमारत जमीनदोस्त झाली आहे. नव्या बसस्थानकाच्या उभारणीसाठी आवश्यक तयारी केली जात आहे. जुन्या वास्तूच्या जागी आधुनिक पायाभूत सुविधांसह नवीन इमारत उभारण्यात येणार असल्याने सातारा बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे.