

सातारा : आखाती देशात सुरू असलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे क्रूड ऑईलच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. क्रूड ऑईलची वाहतूक ठप्प झाल्याने एस. टी. महामंडळाला डिझेल उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बाहेरील जिल्ह्यातील बसेसना डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. याचा परिणाम सातारा विभागातील एस. टींच्या बस फेऱ्यांवरही झाला आहे. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
सातारा विभागातील 11 आगारात विविध तेल कंपन्यांचे पंप आहेत. एसटी महामंडळाकडून दररोज बसेसना मोठ्या प्रमाणात डिझेल लागते. गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात युध्दजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे क्रूड ऑईलची वाहतूक ठप्प आहे. क्रूड ऑईलच येत नसल्याने त्यावर प्रक्रिया करून इंधन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांची क्षमता कमी झाली आहे. यामुळेच मुबलक प्रमाणात डिझेल उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम सातारा विभागातील एसटी बसेसवर झाला आहे.
युध्दजन्य परिस्थितीमुळे पाहिजे त्या प्रमाणात ठेकेदाराकडून डिझेल उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम एसटी फेऱ्यांवर होत आहे. सातारा आगारात पंपावर सातारा विभागातील एसटी बसेसना डिझेल दिले जाते. मात्र, जिल्हाबाहेरील बसेसना डिझेल देणे बंद केले आहे.