

सातारा : नक्षलवाद्यांचा हिंसाचार, दुर्गम भागातील प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा जीवघेणा धोका यांची पर्वा न करता नक्षलविरोधी मोहिमांना प्रभावी नेतृत्व देणारे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या धाडसी कार्याची शासनाने दखल घेतली आहे. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.
सन २०१४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले पिंगळे यांनी यापूर्वी गडचिरोली येथे एसआरपीएफ कमांडंट, तर गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. नक्षलप्रभावित भागातील आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी सुरक्षा यंत्रणांचे प्रभावी नेतृत्व केले. गोंदियातील त्यांच्या कार्यकाळात नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच कारवायांना आळा घालण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. त्यांच्या उपस्थितीत बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याने आत्मसमर्पण केल्याची नोंदही आहे.
धोका समोर असतानाही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य, प्रतिकूल परिस्थितीत धाडसी निर्णयक्षमता आणि नक्षलविरोधी अभियानांना दिलेले सक्षम नेतृत्व या कामगिरीची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. विशेष सेवा पदक हा त्यांच्या सेवाभावी वृत्ती, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव मानला जात आहे. पिंगळे यांच्या या सन्मानामुळे सातारा पोलिस दलाच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.