

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे पडसाद अजूनही सुरूच आहेत. पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे 6 एप्रिलपर्यंत अर्जित रजेवर गेले असल्याचे समोर आल्यानंतर त्यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. देसाई यांनी एसपींना सक्तीच्या रजेवर जावे लागल्याचे म्हटले आहे, तर गोरे यांनी ज्यांना जसे वाटते तसा अर्थ घ्यावा व आनंद लुटावा, असा टोला लगावला.
30 मार्चपासून दोशी सुट्टीवर
दोशी यांना 28 व 29 मार्च रोजी शासकीय सुट्टी होती. यानंतर त्यांनी अर्जित रजेसाठी अर्ज केला. त्यानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे कार्यालय अधीक्षक जयेश परब यांनी 30 मार्च ते 6 एप्रिल अशी अर्जित रजा मंजूर केली. वैद्यकीय तपासणीसाठीही दोशी 2 दिवस पुणे येथे होते.