Satara Drowning incident: भावाच्या लग्नासाठी गावी आलेल्या जवानाचा नदीत बुडून मृत्यू

सूरज सयाजी नलवडे (वय 35) या भारतीय सैन्य दलातील जवानाचा मृतदेह नांदगाव (ता. सातारा) येथील कृष्णा नदीपात्रात आढळून आला
Drowning Incident
Drowning Incident Pudhari Photo
Published on
Updated on

वेणेगाव : सावत्रभावाच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या नलवडेवाडी (ता. कोरेगाव) येथील सूरज सयाजी नलवडे (वय 35) या भारतीय सैन्य दलातील जवानाचा मृतदेह नांदगाव (ता. सातारा) येथील कृष्णा नदीपात्रात आढळून आला. सूरजच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नदीत बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सूरज नलवडे हे भारतीय सैन्यात पठाणकोट येथे कुटुंबासमवेत राहात होते. सैन्य दलात असणारा सावत्र भाऊ संकेत याचे लग्न गेल्या रविवारी होते. या लग्नासाठी सूरज गावी आला होता. दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 9 वाजल्यापासून सूरज बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व मित्रपरिवाराच्या मदतीने शोधाशोध सुरू केली; मात्र त्यांचा काहीही ठावठिकाणा लागत नव्हता. दोन दिवस अखंड शोध घेऊनही यश न आल्याने रहिमतपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनीही शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, 1 मार्च रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास नांदगाव हद्दीतील कृष्णा नदीपात्रात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली असता तो सूरज नलवडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात नदीत बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. गेल्या रविवारी संकेत यांच्या लग्नाच्या आनंद सोहळ्यात सूरज हे सहभागी झाले होते. लग्नानंतर घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नलवडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, याबाबतची फिर्याद संकेत सयाजी नलवडे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news