

विशाल गुजर
सातारा : ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांच्या आयुष्यात उजेडाची नवी पहाट घेऊन येणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत टप्पा क्र. 2 आणि सन 2024-25 मधील लाभार्थ्यांच्या घरकुलांवर 1 किलोव्हॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला अतिरिक्त 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील 28 लाख घरकुलांत सौर मशाल पेटणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, राज्य शासनाने यामध्ये आणखी 50 हजार रुपयांची भर घालत ग्रामीण घरकुलांना सौरऊर्जेची जोड देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 35 हजार रुपये घरकुलांच्या अतिरिक्त कामांसाठी, तर 15 हजार रुपये सूर्यघर योजनेंतर्गत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी खर्च करण्यात येणार आहेत.
राज्यातील तब्बल 27 लाख 85 हजार 819 घरांवर सौर ऊर्जा प्रणाली उभारण्याची कार्यपद्धती ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी निश्चित केली आहे. सौर यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याने पारदर्शकतेवरही भर देण्यात आला आहे.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील वीज बचत, पर्यावरणपूरक ऊर्जा वापर आणि आर्थिक दिलासा यांना चालना मिळणार आहे. विशेषत: दुर्गम भागातील कुटुंबांना कायमस्वरुपी प्रकाशाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.