Satara News : सातार्‍याची वाटचाल स्मार्ट सिटीकडे

ना. शिवेंद्रराजेंकडून छप्पर फाडके २१० कोटींचा निधी : आठ दिवसांतील कामगिरी
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale
Published on: 
Updated on: 

सातारा : सातार्‍याच्या विकासाचा गाडा आता खर्‍या अर्थाने सुसाट धावू लागला आहे. गेल्या आठ दिवसांत २१० कोटींचा निधी खेचून आणत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातार्‍याच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्याचा चंग बांधला आहे. विविध विकास प्रकल्पांमुळे सातारा आधुनिक व स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. सातार्‍याच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेली आघाडी लक्षवेधी ठरली आहे. शासनदरबारी त्यांच्या पाठपुराव्याला मिळत असलेला प्रतिसाद सातारकरांसाठी दिलासादायक ठरला आहे.

पोवईनाका ते बॉम्बे रेस्टारंट चौक या महामार्गाचे काँक्रीटिकरण सुरू आहे. जिल्हा परिषद चौक ते करिअप्पा चौक या मार्गाचेही काँक्रीटिकरण लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी कुबेर विनायक मंदिर ते पुण्यशील सुमित्राराजे उद्यान, जुना आरटीओ रोड या रस्त्यांचे पूर्वीच काँक्रीटिकरण करण्यात आले आहे. आता प्रचंड वर्दळ असलेला राजपथ व राधिका रोडचे काँक्रीटिकरण करण्यात येणार आहे. दर्जेदार रस्त्यांचे हे जाळे तयार झाल्याने सातार्‍यातील वाहतूक सुरळीत होईल, अपघात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सातार्‍याच्या दक्षिण दिशेला प्रस्तावित रिंगरोड खिंडवाडी-अजिंक्यतारा पायथा ते बोगदा परिसरातून जाणार आहे. त्यामुळे सातार्‍यातील अंतर्गत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. करंजे नाका येथे उड्डाणपूल किंवा अंडरपास प्रस्तावित आहे. तसेच अजंठा चौक ते पोवई नाका उड्डाणपूल करण्याचे नियोजन आहे. सातार्‍यात राजवाडा परिसरात बहुमजली पार्किंग इमारत उभारण्यात येणार असून विक्रेत्यांचे स्थलांतर याठिकाणी करण्यात येणार आहे. यामुळे मध्‍यवर्ती भागातील पार्किंगची जुनी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच राजवाडा इमारतीसमोरील जागेचा विकास आराखडाही तयार आहे.

धुळीने माखलेले, खड्डंयानी व वाहतूक कोंडीने ग्रासलेले रस्ते जाऊन सुसज्ज मार्ग मिळाल्यास नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होईल. शाहू कलामंदिर आणि शिवतीर्थ विकासामुळे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशालाही नवी झळाळी मिळणार आहे. पायाभूत सुविधांचा हा विकास सातार्‍याला स्मार्ट व आधुनिक शहर म्हणून नावारूपास आणेल.

सातार्‍यातील विकासकामांच्या प्रस्तावांना नगर विकास खात्याकडून मंजुरी मिळाली आहे. पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी ६ कोटी, श्री शाहू कला मंदिरच्या नव्या उभारणीसाठी ७२ कोटी, राजपथ व राधिका रोड काँक्रीटिकरणासाठी १२४ कोटी मंजूर झाले आहेत. या कामांमुळे सातारा शहराच्या विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा शिंदे यांचे आभार मानतो.
-ना. शिवेंद्रराजे भोसले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.