Satara News : नभांगण जाहले रणांगण!

सैनिकांच्या साताऱ्याचे आभाळ तेजाळले; हवाई थराराने वीरभूमी रोमांचित
Satara News : नभांगण जाहले रणांगण!
Published on: 
Updated on: 

सातारा: 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून देशभरात ओळख असलेल्या साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचा आणि शौर्याचा रोमांचकारी आविष्कार अनुभवायला मिळाला. सातारा जिल्ह्याची गौरवशाली लष्करी परंपरा, सैनिकांचे अतुलनीय योगदान आणि ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबरोबरच जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद वीरांना आदरांजली अर्पण करण्याच्या स्मरणदिनाचे औचित्यही या आयोजनाला लाभले. महाराष्ट्रातील हा पहिलाच एअर शो देशातील पहिल्या सैनिक स्कूलच्या सातारा येथील मैदानावर पार पडला.

भारतीय वायुसेनेच्या 'सूर्यकिरण' एरोबॅटिक टीममधील अनुभवी वैमानिकांनी तब्बल ३५ मिनिटे आकाशात विविध थरारक कसरती सादर केल्या. विमानांची ९, ७, ४, ३, ५ आणि १ अशा विविध समूह रचना, वेगवान हालचाली आणि अचूक समन्वयातून वैमानिकांनी आपल्या कौशल्याची प्रचिती दिली. हवेत एकमेकांना छेद देणाऱ्या विमानांच्या हालचाली, क्षणार्धात बदलणाऱ्या रचना आणि आकाशात उमटणाऱ्या धुरांच्या रेषांनी उपस्थितांना रोमांचित केले. या सादरीकरणातील सर्वांत आकर्षक क्षण ठरला तो म्हणजे धुरांच्या माध्यमातून आकाशात साकारलेला भारतीय तिरंगा! केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या धुरातून साकारलेले राष्ट्रध्वजाचे विहंगम दृश्य पाहून उपस्थित सातारकरांच्या अभिमानाला उधाण आले. याशिवाय इंग्रजी 'X' अक्षर, प्रेमाचे प्रतीक असलेली बदामाची आकृती आणि सूर्यकिरण अशा विविध मनमोहक आकृत्या वैमानिकांनी आकाशात साकारल्या. प्रत्येक कसरतीनंतर टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषाने परिसर दणाणून गेला.

या हवाई प्रात्यक्षिकांनी केवळ सैनिक स्कूलचे मैदानच नव्हे, तर अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड आणि कास पठार परिसरातही ही विमाने झेपावताना दिसून आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले. शहरातील अनेकांनी आपल्या इमारतींच्या गच्चीवरून उंच टेकड्यांवरून, तर काहींनी झाडांवर बसून या अद्भुत सोहळ्याचा आनंद घेतला. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अत्यंत रोमांचक आणि प्रेरणादायी ठरला. भारतीय वायुसेनेची शिस्त, अचूकता, धाडस आणि तांत्रिक कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी त्यांना मिळाली.

'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या भूमीत भारतीय वायुसेनेच्या शौर्याचे असे भव्य दर्शन घडणे, ही प्रत्येक सातारकरांसाठी अभिमानाची बाब ठरली. देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय वायुसेनेच्या जवानांना आणि वैमानिकांना सलाम करत, राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा हा एअर शो साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि पर्यटन वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडून गेला.

या थरारक कसरती पाहण्यासाठी सैनिक स्कूल मैदानावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जि. प. अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, जिल्हा बँक संचालक काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, नगरसेवक पंकज चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, भारतीय हवाई दलाचे स्क्वार्डन लीडर एडवर्ड प्रिन्स, सैनिक स्कूल सातारचे प्राचार्य कॅप्टन टी. एस. रामनाथन, माध्यमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, विंग कमांडर तेजस शिंदे, स्क्वाडर्न लीडर शम्मी संधीर, भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.