

सातारा : सातारकरांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या साताऱ्यातील शिवतीर्थ पोवई नाक्यावरील लढवय्या आवेशातील एकमेव शिवपुतळ्याची उंची वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी 25 फुटी शिवपुतळा व 15 फुटी चबुतरा असा एकूण 40 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामास येत्या शिवजयंतीला म्हणजे 19 फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी यासंदर्भात रविवारी शिवतीर्थाची मूर्तिकार अनिल सुतार यांच्यासमवेत पाहणी केली. दरम्यान, या आराखड्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये सातारा शहराचे वेगाने विस्तारीकरण होत आहे. सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांचा तोफेवर हात ठेवलेला एकमेव पुतळा आहे. अशा स्वरुपातील पुतळा एकमेव साताऱ्यातच आहे. या पुतळ्याची उंची वाढवण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु होती. आता येत्या दि. 19 फेब्रुवारी रोजी या कामाचे प्रत्यक्ष भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. सध्याचा पुतळा जसा आहे तसाच नव्याने उभारला जाणार आहे. यासंदर्भात त्यांनी शिल्प तज्ञ अनिल सुतार यांच्याशी शिवतीर्थावर रविवारी सकाळी चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरसेवक अविनाश कदम, ॲड. दत्तात्रय बनकर, सुशांत महाजन, हेमलता भोसले, सचिन पाटोळे, अक्षय जाधव, दिलीप म्हेत्रे, सीमा भोसले, दिलीप चिद्रे, श्रीकांत गोडसे व इतर उपस्थित होते.
नवीन संपूर्ण पुतळा 40 फुटी असेल. चबुतरा त्याचबरोबर नवीन पुतळ्याची रचना याचा संकल्पित आराखडा, मूर्तीमध्ये करावयास लागणारे बदल आणि स्ट्रक्चरल ऑडिटिंग या विषयावर ना. शिवेंद्रराजे यांनी अनिल सुतार यांच्याकडून माहिती घेतली. या कामासंदर्भात सातारा नगरपालिका तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी घेऊन या कामाची प्रत्यक्ष निविदा प्रसिद्ध करणार आहे. तसेच यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागितल्या जाणार असून अभ्यासपूर्ण सूचनांचा विचार केला जाणार असल्याचे अभिजीत बापट यांनी सांगितले.
शिवतीर्थावरील नव्या शिवपुतळ्याबाबतचा आराखडा बनवण्याचे काम सुद्धा सुरू केल्याचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले. येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी प्रत्यक्ष भूमीपूजन करून या पुतळ्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे ना. शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जुना पुतळा अजिंक्यतारा किल्ल्यावर बसवणार
नव्याने उभारण्यात येणाऱ्या 40 फुटी शिवपुतळ्याला अभिवादन करण्यासाठी स्वतंत्र हायड्रोलिक क्रेन बकेटची सुविधा केली जाणार आहे. पोवई नाक्यावरील सध्याचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा तांत्रिक परवानग्यानंतर येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर सुस्थितीत स्थापित केला जाणार आहे. शिवतीर्थावरील या जुन्या पुतळ्याची उंची 7 फूट असून त्याचा चबुतरा 8 फुटाचा आहे.