Satara Shivsagar Reservoir: शिवसागर जलाशयाने गाठला तळ

कोयना विभागातील दळणवळणावर परिणाम : बोट व्यवसाय ठप्प
Shivsagar Reservoir
Shivsagar ReservoirPudhari
Published on
Updated on

बामणोली : परिसरातील शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने कोयना विभागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. जलाशयातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या घटल्याने कोयना भागातील 105 गावांतील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बामणोली, तापोळा आणि शेंबडी परिसरातील बोट वाहतूक पूर्णपणे बंद पडल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यवसायिक अडचणीत आले आहेत.

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे 105 टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरते त्या काळात हा परिसर निसर्गसौंदर्याने बहरलेला दिसतो. हिरवाईने नटलेले डोंगर, विस्तीर्ण जलाशय आणि बोटींची वर्दळ यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटन फुलते. मात्र दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाण्याची पातळी घटू लागल्यानंतर शिवसागर जलाशयाचे चित्र पूर्णपणे बदलते. पाणी आटल्याने परिसर ओसाड आणि विराण दिसू लागतो.जलाशयाने तळ गाठल्यामुळे बामणोली, तापोळा आणि शेंबडी येथील बोट व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

या भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पर्यटन आणि बोट व्यवसायावर अवलंबून आहे. बोट वाहतूक बंद झाल्याने त्यांच्या रोजगारावर थेट परिणाम झाला असून आर्थिक संकट उभे राहिले आहे. तसेच कांदाटी खोरे, सोळशी खोरे, खरोशी-रेणोशी खोरे या दुर्गम भागांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी जलमार्गाने सहज पोहोचता येणाऱ्या ठिकाणी आता नागरिकांना मैलोनमैल पायपीट करून बामणोली किंवा तापोळा बाजारपेठ गाठावी लागत आहे. त्यानंतर सातारा किंवा महाबळेश्वरकडे पुढील प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.

पाणी ओसरले असल्यामुळे गावांचे जुने अवशेष उघड्यावर आले आहेत. मात्र एका बाजूला जुन्या आठवणींना उजाळा मिळत असला, तरी दुसऱ्या बाजूला जलाशय आटल्याने संपूर्ण परिसर ओसाड दिसत असून पर्यटन व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पर्यायी दळणवळण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

logo
Pudhari News
pudhari.news