

सातारा : शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांना तीन महिलांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा नसल्यास २० लाख रुपयांची खंडणी मागून १० लाखांला सेटलमेंट केल्याचा प्रकार उघडकीस आला. हे १० लाख रुपये स्वीकारण्याच्या हेतूने आलेल्या संशयित महिलांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सेनेच्या जिल्हाध्यक्षावर हनी ट्रॅपचा प्रकार झाला असून, यावरून संबधित महिलांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात खंडणीचा (ब्लॅकमेलिंग) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोघींना अटक केली असून, एकजण पसार झाली आहे. या प्रकाराने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत बाळासाहेब जाधव (वय ५५, रा. तासगाव, ता. सातारा) यांनी सविता शिंदे, गौरी पंडीत, सोनाली शिंदे यांच्याविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यातील सविता शिंदे व गौरी पंडीत या दोघींना अटक करण्यात आली असून, १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. संशयित महिलांपैकी गौरी पंडीत या महिलेने तक्रारदार चंद्रकांत जाधव यांना वेळोवेळी फोन केले आहेत. फोनवर संशयित महिलेने एका महिलेसोबत तुमचे आक्षेपार्ह व्हिडीओ आहेत. ते व्हिडीओ त्या महिलेने माझ्याकडे पाठवले आहेत. तसेच त्या महिलेने पुढील जबाबदारी आमच्या दोघींवर सोपवली आहे,' असे फोनवर म्हटल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. हे प्रकरण मिटवायचे असेल तर संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओसाठी २० लाख रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल, अशी धमकी महिलेने तक्रारदार चंद्रकांत जाधव यांनी दिली. या घटनेमुळे तक्रारदार घाबरले. यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाणे गाठले. घडत असलेल्या घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर संशयित महिला १० लाख रुपये घेण्यासाठी तयार झाल्या. त्यानुसार पोलिसांनी पुढे सापळा रचला. संबंधित महिलांना देण्यासाठी १० लाखांची रक्कम बॅगेत ठेवण्याऐवजी पोलिसांनी ९.८० लाखांच्या नोटा बनावट ठेवल्या आणि त्याच्यावर खर्या २० हजारांच्या नोटा ठेवल्या. ही रोख रक्कम तक्रारदार यांनी सातारा महामार्गावरील तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये दिली. संबंधित २ महिलांनी ते पैसे स्वीकारले. चंद्रकांत जाधव यांनी तिन्ही महिलांविरुद्ध खंडणीची तक्रार दिली.
तक्रारीवरून पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला. दरम्यान, यातील संशयित सविता शिंदे व सोनाली शिंदे या दोन्ही महिला राजकारणाशी संबंधित आहेत. सध्या एका महिलेकडे राजकीय पद देखील आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सविता शिंदे व गौरी पंडीत या दोघींना अटक केली असून, सोनाली शिंदे पसार झाली आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.