Satara News: शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात साताऱ्याचा डंका

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ५७, तर जिल्हास्तरीय यादीत ९६९ विद्यार्थी
Satara News
Satara News: शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात साताऱ्याचा डंका
Published on
Updated on

सातारा : राज्य परीक्षा परिषदतर्फे झालेल्या चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील ५७ विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर ९६९ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी चमकले असून, वडले (ता. फलटण) येथील आरती ओंडेने चौथी ग्रामीणमध्ये राज्यात तिसरा तर खटावच्या राजवर्धन सानपने चौथी शहरीमध्ये राज्य गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावला.

शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी झाली होती. चौथीसाठी २२ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६ हजार ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर सातवीसाठी १५ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ हजार ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चौथीचे ग्रामीणमधून १२ व शहरीमधून १३, सीबीएसई मधून २ असे मिळून २७ तर सातवीचे ग्रामीणमधून ७ व शहरीमधून २३ असे मिळून ३० विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले.

चौथीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आरती ओंडेने ९७.३३ टक्के गुण मिळवून ग्रामीणमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तर शिवाजी प्राथमिक शाळा वडूज (ता. खटाव) येथील राजवर्धन सानपने याने ९५.३३ टक्के गुण मिळवून शहरी विभागात चौथा क्रमांक पटकावला. अब्दागिरेवाडी (ता. फलटण) येथील रूद्रप्रताप निंबाळकरने ९६ टक्के गुण मिळवून ग्रामीण विभागात पाचवा क्रमांक पटकावला. भोसरे (ता. खटाव) येथील शिवम फडतरेने ९५.३३ टक्के गुण मिळवून ग्रामीण विभागात सहावा क्रमांक पटकावला.

सातवी शहरी विभागात सी. एस. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खटावच्या गीत घोडकेने ९६.६६ टक्के गुण मिळवून दुसरा तर आदर्श विद्यामंदिर रहिमतपूर (ता. कोरेगाव) च्या समर्थ कदमने ९६ टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला. ग्रामीण विभागात पिंपरी (ता. कोरेगाव) येथील निर्विघ्न जाधवने ९४ टक्के गुण मिळवून पाचवा, शेंदूरजणे (ता. वाई) येथील सारंग गायकवाडने ९४ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे जि.प. अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, ऋषीकेश धायगुडे पाटील, ऋतुजा शिंदे, लता कर्णे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news