Satara Crime: शिंदेवाडीत युवकावर गोळीबार; मध्यरात्री थरार

शिरवळच्या चौघांना अटक
Satara Crime: शिंदेवाडीत युवकावर गोळीबार; मध्यरात्री थरार
Published on
Updated on

शिरवळ : मैत्रिणीला भेटायला गेलेल्‍या युवकाचा पाठलाग करत त्‍याला रॉडने मारहाण करून गोळीबार केल्‍याची घटना शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे सोमवारी मध्‍यरात्री घडली. या घटनेत संबंधित युवक गंभीर जखमी झाला. ओंकार दत्तात्रय क्षीरसागर (वय २६, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे जखमी युवकाचे नाव आहे. घटनेनंतर शिरवळ पोलिसांनी अवघ्‍या चार तासात संशयितांना बिबवेवाडी, पुणे येथून अटक केली.

राकेश राजेश महातो, सिद्धेश सतीश गोलांडेे, ओंकार माने आणि भुषण दिलीप शेटे (सर्व रा. शिरवळ) अशी अटक केलेल्‍या संशयितांची नावे आहेत. ओंकार हा माने याच्‍या घरी का गेला, यातून हा गोळीबार केल्‍याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आणि ओंकार यांच्‍यात वैर असल्‍याने संशयित ओंकारच्‍या मागावर होते. ओंकार हा शिंदेवाडीत मैत्रिणीला भेटायला जाणार असल्‍याची माहिती संशयितांना मिळाली होती. त्‍यानुसार संशयितांनी शिरवळपासून शिंदेवाडीपर्यंत पाठलाग केला. शिंदेवाडीत आल्‍यानंतर मध्‍यरात्री ओंकारवर हल्‍ला केला. सुरुवातीला रॉड आणि विटांनी त्‍याला मारहाण केली. यामध्‍ये ओंकार गंभीर जखमी झाला. यामधूनही ओंकार पळून जात असल्‍याने संशयितांनी ओंकारवर गोळीबार केला. यामध्‍ये त्याला एक गोळी लागली. या घटनेनंतर संशयित पसार झाले.

या घटनेनंतर स्‍थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोनि महेश इंगळे व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यादरम्यान पिस्तूलचे एक मॅगझिन तसेच गोळीबारात वापरलेल्या काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या. यानंतर ओंकारला पुण्‍यातील ससून रुग्‍णालयात दाखल केले. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवली. संशयितांचे लोकेशन ट्रेस केले असता ते पुण्‍यात असल्‍याचे समजले. चार तासात बिबवेवाडी, पुणे येथून संशयितांची उचलबांगडी केली. या घटनेची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news