

सातारा : शेंद्रे, ता. सातारा येथे उसाच्या शेतात ऊसतोड मजुरांना मानवी सांगाडा निदर्शनास आला असून, संबंधित व्यक्तीचा खून झाला की त्याने आत्महत्या केली, याचा पोलिस तपास करत आहेत. हा प्रकार रविवारी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आला.
शेंद्रे, ता. सातारा येथील शेतकरी आबासाहेब पडवळ यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. ऊसतोड सुरू असतानाच काही मजुरांना मानवी सांगाडा दिसून आला. यानंतर त्यांनी पडवळ यांना याची माहिती दिली. पडवळ यांनी तातडीने शेतात धाव घेऊन पाहणी केली असता मानवी सांगाडा विखुरलेला त्यांच्या निदर्शनास आला. सातारा तालुका पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक नीलेश तांबे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
मानवी सांगाड्यावर मांस नसल्यामुळे हा सांगाडा पुरुषाचा की स्त्रीचा आहे. हे पोलिसांना समजू शकले नाही. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचे अवशेष जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. संबंधित मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच हा नेमका प्रकार काय आहे, हे समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.