Shaurya Yatra fraud | सातार्यात शौर्य यात्रा कंपनीकडून गंडा
विठ्ठल हेंद्रे
सातारा : कमी पैशात शौर्य यात्रा या टुरिस्ट कंपनीकडून पर्यटकांना फिरायला नेतो, असे आमिष दाखवून पैसे घेऊन सहल न घडवता शेकडो जणांना गंडा घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात शेकडो पर्यटकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असून, अनेकांचे फॉरेनचे स्वप्न हवेतच राहिले आहे.
सातार्यात सिव्हिल हॉस्पिटल रस्त्याच्या दिशेने शौर्य यात्रा नावाच्या कंपनीचे ऑफिस आहे. या टुरिस्ट कंपनीने मे 2024 मध्ये कमी पैशात भारत देशासह फॉरेनसाठी काही स्किम देण्याची जाहिरात केली होती. टुरिस्टच्या कार्यालयातून माहिती व त्याबाबतचे पॅम्पेलटही नागरिकांना वाटण्यात आले होते. मे 2024 मध्ये बुकिंग करणार्यांना एप्रिल- मे 2025 मे मध्ये सहलीसाठी घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
फिरायला जाण्याचा किफायतशीर प्लॅन टुरिस्ट कंपनीने दिल्याने अनेक नागरिकांनी धडाधड बुकींग केले. फिरायला जाण्यासाठी लागणारी सर्व माहिती व पैसे देखील नागरिकांनी भरले. कोणी पैसे रोख भरले तर अनेकांनी ऑनलाईन खात्यावरुन पैसे पाठवले. संबंधित यात्रा कंपनीने त्यांच्या लेटरहेडवर पैसे घेतल्याची पोहच देखील दिली आहे. एक वर्षापूर्वी पैसे भरल्याने पर्यटक हरखून गेले. एप्रिल 2025 उजाडल्यानंतर फोनाफोनी करुन सहलीची तारीख विचारु लागले. मात्र, यात्रा कंपनीकडून तारीख कळवतो, सांगतो, मे महिन्यात सहल जाईल असे सांगण्यात आले.
मे महिना उजाडल्यानंतर पैसे भरणार्यांनी यात्रा कंपनीला पुन्हा फोन करण्यास सुरुवात केली. मात्र यात्रा कंपनीकडून पुन्हा तारीख कळवतो, सांगतो, सहल लवकरच जाईल असे सांगण्यात आले. मे संपला तरी तारीख मिळत नसल्याने सहलीला जाणार्यांची चलबिचल अधिक वाढली. यात्रा कंपनीचे कार्यालय गाठल्यानंतर तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अनेकदा कार्यालय बंदही दिसू लागले. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर यात्रा कंपनीबाबत संतापाची लाट निर्माण झाली. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा बुकींग केलेल्या नागरिकांकडून देण्यात आला आहे.
अनेक जिल्ह्यांत फसवणूक?
शौर्य यात्रा कंपनीने सातार्यातच नव्हे, तर अनेक जिल्ह्यांमध्ये फसवणुकीचा हा फंडा केल्याचे समोर येत आहे. यामुळे हा मोठा घोटाळा असून, फसवणुकीचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. यात्रा कंपनीच्या मालकाचा व्हॉटस्अॅप ग्रुप असून, तो त्यावर अॅक्टिव्ह असतो. यामुळे पोलिसांनी तत्काळ गुन्हे दाखल करून संशयितावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

