Satara Navratri Festival : अंबा बैसली सिंहासनी!

जिल्ह्यात ‘उदं गं अंबे उदं’चा जागर : शारदीय नवरात्रौत्सवाने भक्तीचा जागर
Satara Navratri Festival : अंबा बैसली सिंहासनी!
Published on: 
Updated on: 

सातारा : ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी...’च्या गजरात जिल्ह्यात शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. सातारा शहरासह जिल्ह्यात रविवारी घटस्थापनेने आदिशक्ती, आदिमायेचा जागर भक्तिमय वातावरणात सुरू झाला. नवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी देवींच्या मंदिरांवर रोषणाईसह विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवघं जनजीवन भक्तिमय होऊन गेले आहे.

नवरात्रातील पहिली माळ व घटस्थापनेचा मुहूर्त दुपारपर्यंत असल्यामुळे घरोघरी धार्मिक वातावरणात देवी स्तुती, स्तोत्रे व मंत्र जागरासह घटस्थापना केली. देवघराच्या वेदीवर घटस्थापना करून सप्तधान्यांची पेरणी करत नवरात्र उपासना सुरू झाली. या पुढील नऊ दिवस देवीची आराधना व भक्तीचा जागर होणार आहे. श्री क्षेत्र औंध येथील मूळपीठ निवास यमाई देवी, मांढरदेव येथील श्री काळुबाई, देऊर येथील मुधाईदेवी मंदिर, प्रतापगड येथील तुळजाभवानी, भुईंज येथील महालक्ष्मी देवी, आसलेची भवानी माता यांसह विविध देवीदेवतांच्या मंदिरात आज सकाळीच घटस्थापना करून नवरात्रीला प्रारंभ झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथील निवासस्थानी तुळजाभवानीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून उत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. तसेच अजिंक्यतारा किल्‍ल्यावरील व पायथ्याची मंगळाई देवी, राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद परिसरातील श्री दुर्गादेवी मंदिरातही सालंकृत पूजा बांधली असून, पुढील नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीने सांगितले. अजिंक्यतारा किल्ल्यावरील ग्रामदैवत मंगळाई देवी तसेच तटाखालील मंगळाई देवी मंदिरात नवरात्रीचे आयोजन केले.

सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांच्या दुर्गा मूर्ती वाजत-गाजत मंडपात आणून त्यांची प्रतिष्ठापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चौका-चौकांत मंडळांनी लावलेल्या दुर्गामातेच्या भक्तिगीतांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. घटस्थापनेसाठी सकाळपासून दुपारी साडेबारापर्यंत शुभमुहूर्त असल्याने घरोघरी धांदल उडाली होती. महिला व नागरिकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news