

कोपर्डे हवेली : पाटण तालुक्यानंतर आता कराड तालुक्यातील केमिकल माफियांनी घाटामध्ये केमिकल टाकण्याचे उद्योग सुरू केले आहे. यामुळे पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाटण तालुक्यात विषारी केमिकलची बेकायदा विल्हेवाट लावण्याच्या घटना समोर आल्यानंतर आता कराड तालुक्यातही अशाच प्रकाराला सुरुवात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
कराड-पुसेसावळी मार्गावरील शामगाव घाट परिसरात केमिकल ओतून जाणारा एक टँकर करवडी ग्रामस्थांना आढळून आला. यावेळी सतर्क झालेल्या करवडी गावातील ग्रामस्थांनी संबंधित कंटेनर अडवून पकडल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे यापुर्वीही किती केमिकल याठिकाणी टाकण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंटेनरमध्ये औद्योगिक केमिकल असल्याचा संशय असून ते घाट परिसरात किंवा जवळच्या भागात बेकायदा टाकण्याचा प्रयत्न होत होता. यापूर्वी पाटण तालुक्यात अशा प्रकारे केमिकलची विल्हेवाट लावण्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता कराड तालुक्यातही अशाच पद्धतीने केमिकल टाकले जात असल्याचा संशय बळावत आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी कंटेनर रोखून प्रशासनाला याची माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंटेनरमध्ये नेमके कोणते रसायन होते, ते कोठून आणले जात होते आणि ते कुठे टाकण्याचा प्रयत्न सुरू होता, याचा तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शामगाव घाट परिसर हा नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील भाग असून येथे विषारी रसायनांची विल्हेवाट लावल्यास पाणी, माती, शेती तसेच वन्यजीव आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करवडीसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.