

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या जखमांवर खपली धरण्याऐवजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन निवडीनंतर या जखमांवरच मीठ चोळण्याचे काम पालकमंत्री शंभूराज देसाई व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सुरू आहे. महायुतीत पुन्हा एकदा वादाचा वणवा पेटला असून ढपली पुन्हा निघाली आहे. एका बाजूला महायुतीत वाद पेटला असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील शीतयुद्धाने त्यांच्यातली खपली भेगाळली आहे. सातारा जिल्हा परिषद व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात महायुतीतील घटकपक्षच आमने-सामने येताना दिसणार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या करंगळीला जखम झाली. त्याचवेळी ‘सुरुवात भाजपने केली आहे. त्याचा शेवट आम्ही करणार’, असे विधान शंभूराज देसाई यांनी केले होते. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर विधिमंडळातही रणकंदन झाले. तरीही सातारा जिल्ह्यातील अनेक बैठकांना महायुतीतील हे मंत्री एकत्र दिसायचे. ‘काही जखमा लवकर बर्या होत नाहीत त्या खोलवर असतात’, असे विधान शंभूराज देसाई यांनी मधल्या काळात केले होते.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन भाजपचे उट्टे काढले, जिल्हा परिषदेचा बदला जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेतला. ‘काही जखमा वरून बर्या झाल्यासारख्या दिसतात, पण त्या खोलवर असतात. त्या बर्या होण्यासाठी थोडा उशीर लागतो आणि जालीम औषध घ्यावं लागतं,’ असे विधान शंभूराज देसाई यांनी लगोलग केले. त्याला भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात उत्तर दिले.
अघोरी विद्येने जालीम उपचार करण्याचा प्रयत्न केला तर जखम बरी होत नाही ती आणखी चिघळते. किंबहुना, त्याचे परिणाम आणखी गंभीर होतात, असा इशाराच जयकुमार गोरे यांनी दिला. बदल्याची आणि जखमा भरण्याची भाषा करणार्यांच्यात दम होता तर त्यांनी समोरासमोर लढाई करायची होती, असेही गोरे म्हणाले. कोणताही पराभव अंतिम नसतो. कोणतीही निवडणूक अंतिम नसते, असे सांगून गोरे यांनी एकप्रकारे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनाही चॅलेंज दिले. एकीकडे भाजपविरुद्ध राष्ट्रवादी-सेना एकमेकांच्या जखमांवर असे मीठ चोळून जखमांची खपली भरण्याऐवजी जखम चिघळवण्याचेच काम करत असताना भाजपमध्येही पक्षांतर्गत शीतयुद्ध सुरू झाले आहे.
जयकुमार गोेरे यांनी ‘महायुतीतील बैठकांच्या निर्णयाचे अधिकार शिवेंद्रराजेंकडे होते’, असे म्हटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवेंद्रराजेंनी ‘चांगलं झालं की मी केलं आणि झालं नाही की बाबांना जाऊन विचारा,’ असं कसं चालेल? काही गोष्टी न बोलता मिळतात आणि काही गोष्टी आपण बोलून घालवतो एवढं मला कळतं, असे विधान करून शिवेंद्रराजेंनी जयकुमार गोरेंच्या स्वभावावरच बोट ठेवले.
जयकुमार गोरेंनी पुन्हा दुसर्या दिवशी माध्यमांशी बोलताना, ‘पराभवाची जबाबदारी माझीच इतर कोणीही जबाबदार नाही’, असे सांगताना जिल्ह्यातील भाजपच्या नेते व उमेदवारांना कशी मदत केली याची जंत्री सादर केली. त्याचवेळी आपले सहकारी अर्जुन काळे यांना पाडण्याचे कसे प्रयत्न झाले यावरही त्यांनी बोट ठेवलं आहे. शिवेंद्रराजेंनीही शुक्रवारी माध्यमांशी बोलताना ‘वरिष्ठांनी जे सांगितले ते घटक पक्षांनी ऐकले नाही,’ असा आरोप करतानाच ‘पक्षांतर्गत कुरघोड्यांनी आमचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न झाले’, असा गौप्यस्फोट केला. त्याचवेळी ‘मुख्यमंत्र्यांच्या मनातील महायुती टिकावी यासाठी मी स्वत: माझ्या कार्यकर्त्यांची माघार घेऊन नाराजी ओढवून घेतली,’ असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
महायुतीतील चारही मंत्र्यांमध्ये लागलेला हा कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाही. महायुतीत जखमा लिपण्याऐवजी ढपल्या काढण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता व जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्तेतही अस्वस्थता आहे. जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसणार आहेत. यारच एकमेकांवर वार करू लागल्यामुळे महायुतीतील तणाव वाढत चालला आहे.