Satara News : शाहूपुरी पोलिसामुळे चेन स्‍नॅचर ‘सुटला’

सातार्‍यातील घटना : संशयिताचा मोबाईल स्‍वीच ऑफ
Chain Snatching
Chain SnatchingPudhari
Published on
Updated on

सातारा : सातारा शहरासह शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्‍या दिवसांपासून सलग चेन स्‍नॅचिंगच्या घटना घडत असताना संशयिताला पकडल्‍यानंतर मात्र शाहूपुरी पोलिसाच्या कामकाजातील त्रुटीमुळे चेन स्‍नॅचर न्‍यायालयातून सुटला असल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना गुंगारा देणार्‍या स्‍नॅचरचा मोबाईल आता स्‍वीच ऑफ लागत असल्‍याने पोलिसांची गोची झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरासह उपनगरामध्ये गेल्‍या १५ दिवसांमध्ये तब्बल ७ चेन स्‍नॅचिंगच्या घटना घडल्‍या आहेत. अचानक दुचाकीवरुन येवून महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचा ऐवज ओरबडून नेला जात आहे. पायी चालत जाणार्‍या, दुकानात बसलेल्‍या, फिरायला जाणार्‍या महिला टार्गेट झाल्‍याने त्‍यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्‍याचे वास्‍तव आहे.

शहर पोलिस व शाहूपुरी पोलिसांनी संशयित चेन स्‍नॅचरना पकडण्यासाठी जंगजंग पछाडले असताना चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी ठेवत होते. दोन दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने संशयित चेन स्‍नॅचरला लिंबखिंड परिसरातून ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून त्‍याला अटक करण्यात आली. दुसर्‍या दिवशी संशयिताला न्‍यायालयात हजर केले असता तपासी अधिकार्‍याकडून कागदपत्रामध्ये काही त्रुटी राहिल्‍या. यामुळे न्‍यायालयातून संशयिताची सुटका झाली. यानंतर संशयित सुसाट तेथून पसार झाला. बंदोबस्‍तावर असलेल्‍या पोलिसांना ही बाब समजेपर्यंत संशयित मोबाईल स्‍वीच ऑफ करुन ‘नौ दो ग्यारह झाला. दुसरीकडे कागदपत्रातील त्रुटी दुरुस्‍त करुन पुन्‍हा संशयिताला न्‍यायालयात हजर करण्याचा विचार शाहूपुरी पोलिसांचा हाेता. मात्र संशयित सापडत नसल्‍याने पोलिसांवर कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news