

सातारा : अदानी प्रकल्पामुळे डोंगर पोखरले जात असून, त्याविरोधात पाटण तालुक्यातील सात गावे एकवटली असून, त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली. या कंपनीकडून सुरू असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे गावांना धोका होणार की नाही हे प्रशासनाने स्पष्ट करावे, त्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करावे, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अदानी कंपनीच्या अधिकार्यांनी संबंधित गावांमध्ये जाऊून ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण करावे, त्यांना विश्वासात घेऊन मगच काम सुरू करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिल्या.
पाटण तालुक्यातील अदानी कंपनीकडून धरण परिसरात सुरू होणार्या पंप स्टोअरेज जलविद्युत प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली. कळंबे, फळवाडी, केंजळवाडी, भोकरवाडी, बामणेवाडी, बागलेवाडी या गावांनी अद्याप जमिनी दिल्या नसून, या प्रकल्पाविरोधात संबंधित ग्रामस्थांचा स्पष्ट विरोध दिसून येत आहे. त्यामुळे या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियोजन भवन येथे भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, अदानी कंपनीचे अधिकारी, सुनील सपकाळ, सखाराम सकपाळ, बाळासाहेब सपकाळ, विजय सपकाळ, नवनाथ सपकाळ, गोरखनाथ सपकाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
संबंधित गावांचा परिसर हा भूस्खलन आणि दरडप्रवण असल्याने पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागते. अदानी कंपनी जलविद्युत प्रकल्पासाठी डोंगर पोखरत असून काही ठिकाणी खोल खड्डे खणले आहेत. त्यामुळे संबंधित गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या कंपनीने शेतकर्यांना फसवून 60 ते 70 टक्के जमिनी विकल्या आहेत. अदानी कंपनीचे नाव असले तरी दुसरीच कंपनी काम करीत 19102025-डरींरीर-01असून वेगळ्याच कंपनीकडून जागा खरेदी केली जात आहे. या प्रकल्पाबाबत सावळागोंधळ सुरु असून संबंधित गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे की नाही, हे प्रशासनाने स्पष्ट करावे व मगच काम सुरु करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, संबंधित कंपनीच्या अधिकार्यांनी गावात जाऊन ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करावे. संबंधित गावांना धोका आहे की नाही हे स्पष्ट करावे. तसेच गरज भासल्याने स्वत: संबंधित गावांना भेट देऊ, असे आश्वासनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.