

सातारा : व्हिडीओ कॉल करून एटीएस (दहशतवादी विरोधी पथक) चे अधिकारी असल्याचे सांगून सुमारे ५८ लाख ५० हजार रुपयांची सातार्यातील एका वृद्धाची फसवणूक झाली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला.
रघुनाथ विद्याधर लाटकर (वय ६२, रा. शाहूपुरी, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना २७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत घडली. अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराला फोन करून ‘अपराधीक जाँच कार्यालयातून बोलतोय,’ असे भासवले. संशयिताने तो एटीएस विभागाचा पोलिस अधिकारी असे सांगितले. संबंधित कॉल हा मनी लाँडरिंग प्रकरणाबाबत करून अटक करणार असल्याची भीती दाखवली. यावेळी संशयिताने खोटे व्हेरीफिकेशनही करत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.
मनी लाँडरिंग प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी संशयिताने आरटीजीएसद्वारे लाखो रुपये पाठवण्यास सांगितले. ते पैसे डिपाॅझिट राहतील. तसेच, चौकशी झाल्यानंतर पैसे परत पाठवले जातील, असे संशयिताने सांगितले. यामुळे तक्रारदार वृद्ध घाबरले. संशयित अनोळखी व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे तक्रारदाराने प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. वेळोवेळी सुमारे ५८ लाख ५० हजार रुपये पाठवले. तोपर्यंत संशयिताने चौकशीचे नाटक करून तक्रारदाराला फसवले. तक्रारदाराने चौकशी पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर परत पैसे पाठवण्यास सांगितले. मात्र, संबंधित क्रमाकांवरील अनोळखी व्यक्तीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सलग दुसरी घटना... सातारकर टार्गेट...
सातार्यात दोन दिवसांत ही सलग दुसरी घटना घडली आहे. सातार्यातील माहुली येथील महिलेलादेखील व्हिडीओ कॉल करून घाबरवून सोडत ८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. हा गुन्हा दाखल होताच शाहूपुरी येथील वृद्धाची मोठ्या रकमेची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांच्या रडारवर सातारकर आल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.