Satara DCC Bank| खा. उदयनराजे, गोेरेंना वगळून महायुतीची खलबते

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी नेत्यांच्या स्वतंत्र रणनीतीने खळबळ : राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Satara DCC Bank
Satara DCC Bank Pudhari photo
Published on: 
Updated on: 

सातारा : मंत्री जयकुमार गोरे हे जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, असे ठासून सांगत असताना दुसरीकडे गोरे व खा. उदयनराजे भोसले यांना वगळून महायुतीची गुप्त खलबते रविवारी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये झाल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. १८) होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बँकेच्या सत्ताकारणात आपले वर्चस्व कायम राखण्याबरोबरच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत मंत्री गोरे यांची भूमिका मर्यादित ठेवण्यासाठी महायुतीतील काही नेत्यांनी स्वतंत्र रणनीती आखल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपचे संचालक निवडून आणण्यासाठी खा. उदयनराजे भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असतानाही त्यांनाच या बैठकीपासून दूर ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत समन्वय आणि नेतृत्वाच्या भूमिकेवर नव्याने प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरीकडे मंत्री गोरे यांनी बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच ठरवणार असल्याचे सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे बँकेच्या अध्यक्षपदाची निवड केवळ स्थानिक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचा विषय राहिलेली नसून त्याला राज्यस्तरीय राजकीय समीकरणांची जोड मिळाली आहे. त्यामुळे साताऱ्यातील नेत्यांच्या बैठका आणि पडद्यामागील हालचालींना अंतिम मान्यता मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरून मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी खा. उदयनराजे यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या संचालकांना निवडून आणण्यासाठी उदयनराजेंनी बजावलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते. असे असताना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या राजकीय बैठकांमध्ये त्यांचा सहभाग नसल्याची चर्चा सुरू झाल्याने पक्षांतर्गत राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. एकीकडे गोरे यांचे विधान, दुसरीकडे उदयनराजेंना बैठकीपासून दूर ठेवल्याची चर्चा आणि तिसरीकडे महायुतीतील काही नेत्यांची स्वतंत्र मोर्चेबांधणी, अशा तिहेरी राजकीय घडामोडींमुळे बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. अध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावरील राजकीय पकड कोणाच्या हातात राहणार, याची उत्सुकता वाढली आहे.

फडणवीस कोणाची समजूत काढणार?

बँकेच्या सत्तेसाठी महायुतीतील नेत्यांमध्येच मतभिन्नता निर्माण होत असल्याची चर्चा पुढे येत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपच्या संचालकांना निवडून आणण्यात योगदान देणाऱ्या नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणार की स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना प्राधान्य मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अध्यक्षपदाची निवड ही केवळ एका पदाची निवड नसून जिल्ह्यातील महायुतीच्या राजकीय वर्चस्वाची आणि नेत्यांमधील समन्वयाचीही परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे फडणवीस या संपूर्ण घडामोडीत हस्तक्षेप करून नेत्यांमध्ये समन्वय साधणार का, उदयनराजेंची भूमिका काय राहणार आणि गोरे यांच्या विधानानुसार अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरून होणार का, या प्रश्नांची उत्तरे बुधवारच्या निवडीतून मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.