

सातारा : सातार्यातील सायन्स काॅलेजच्या होस्टेलवरुन श्रृष्टी भानुदास बिरामणे (वय १९, रा. आंब्रळ, ता. महाबळेश्वर) या विद्यार्थिनीने होस्टेलमधील चौकशीकामी कुटुंबियांना बोलवले जाणार या भितीतून आत्महत्या केली.याप्रकरणी पोलिसांनी जबाब घेण्यास सुरुवात केली असून शहर पोलिस ठाण्यात घटनेची प्राथमिक नोंद झाली.
श्रृष्टीने बुधवारी रात्री ८ च्या सुमारास होस्टेलमधील तिसर्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्यानंतर महाविद्यालय परिसर हादरुन गेला. यामुळे मुलींमध्ये भितीचे वातावरण पसरले. जखमी श्रृष्टीला सिव्हीलमध्ये नेले. मात्र तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिरामणे कुटुंबिय सिव्हीलमध्ये आल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. श्रृष्टीने आत्महत्या का केली? हा प्रश्न उपस्थित झाला. प्राथमिक तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोनि सचिन म्हेत्रे यांनी सांगितले.
मुलींच्या वसतिगृहामध्ये शिस्तीसंबंधी सर्वांचीच माहिती घेतली जाते. काही दिवसांपूर्वी एक आक्षेप निर्माण करणारा मजकूर लिहला गेला होता. त्यामुळे वसतिगृह अंतर्गत चौकशी सुरु होती. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित मुलींच्या कुटुंबियांनाही बोलवले जाणार होते. यामुळे श्रृष्टी दडपणाखाली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी पोलिसांनी माहिती दिली.
चिठ्ठीतील अक्षर तपासले जाणार
श्रृष्टीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. ती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार चिठ्ठीमध्ये थेट कोणाला जबाबदार धरलेले नाही. तरीही पोलिस तपास करुन चिठ्ठीमधील अक्षर हे श्रृष्टीचेच आहे का? हे तपासले जाणार असल्याचे पोनि म्हेत्रे यांनी सांगितले.