

पळशी : कोलवडी, ता. कोरेगाव येथे सातारा रोड - पळशी रस्त्यावर सोमवारी रात्री भरधाव आलेल्या कारने विरुद्ध बाजूने जात 11 वर्षांच्या मुलीला ठोकर दिली. यामध्ये मुलगी जागीच ठार झाली. त्यानंतर चालकाने अन्य दुचाकीला धडक देत कार सोडून पळून गेला. याप्रकरणी मध्यरात्री कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अपघातात ठार झालेल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. वाहनचालकाला अटक करेपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर सातार्यातील जिल्हा रुग्णालयासमोर तणाव निर्माण झाला होता.
जान्हवी सतीश जगदाळे (वय 11) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे, तर दुचाकीवरील रामदास दत्तू दिसले आणि सुशांत रामदास दिसले (रा. परतवडी) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी ज्योतिराम एकनाथ जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे. कोलवडी गावच्या हद्दीत सोमवारी रात्री कार (एम एच 11 बी एक्स 0250) ही भरधाव वेगाने आली. कारचालक बेफाम होऊन ती चालवत होता. चुकीच्या दिशेने जाऊन कारचालकाने जान्हवीला धडक दिली. यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर कारचालकाने पुढे जाऊन एका दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर कारचालक कार सोडून पळून गेला.
अपघाताच्या आवाजाने ग्रामस्थांसह युवकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रसंगावधान राखत तातडीने जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले. जान्हवीचा मृृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी कारचालकाला पोलिसांनी अटक न केल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिस अधिकार्यांनी सातारा रोड पोलिस दूरक्षेत्रामध्ये तळ ठोकून नातेवाईकांशी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.