

तारळे : काहीही कामधंदा न करता दारू पिऊन घरात त्रास देत मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीसह मुलगा आणि मुलीने मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला. तारळे (ता. पाटण) विभागातील सवारवाडी येथील या खूनप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
रमेश कोडिंबा खरात (वय 45) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी लक्ष्मी (वय 42), मुलगा हरीष (वय 22, दोघेही रा. सवारवाडी, कडवे बुद्रूक, ता. पाटण) आणि मुलगी अश्विनी उमेश शिंदे (वय 24, रा. नागठाणे, ता. सातारा) या संशयितांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रमेश हा कामधंदा न करता दारू पिऊन पत्नी लक्ष्मी हिला वारंवार मारहाण करत असे. 25 जुलैला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आवडीची भाजी न केल्याने दारूच्या नशेत रमेशने लक्ष्मी हिला मारहाण केली. यावेळी आईला वाचविण्याचा प्रयत्न करणार्या अश्विनी शिंदे हिला सुद्धा त्याने मारहाण केली. अश्विनीने याची माहिती भाऊ हरिषला दिली. शनिवार, 26 जुलैला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रमेश याने पत्नीसह हरिष व अश्विनीसोबत वाद घातला. यावेळी दररोजच्या त्रासाला कंटाळून तिघांनी लाकडी दांडक्याने रमेशला हातावर, पायावर मारहाण केली. जखमी रमेश शनिवार दुपारी 1 वाजल्यापासून घरीच बेशुद्ध पडला होता, असे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.
रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर उंब्रज पोलिस सवारवाडीतील खरात यांच्या घरी गेले. त्यानंतर कडवे बुद्रूक व कोंजवडे येथील पोलीस पाटीलांच्या मदतीने उपचारासाठी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यापूर्वीच रमेश खरातचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस हवालदार राजकुमार कोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती उंब्रज पोलिसांनी दिली आहे.
मारहाणीत हातापायासह शरीरावर इतरत्र गंभीर दुखापती झाल्या होत्या. या दुखापतींमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानेच रमेशचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून समोर आले आहे. शनिवारी दुपारपासून घरात बेशुद्ध अवस्थेत निपचित पडूनही रुग्णालयात न नेता रमेश याला ठार केल्याचा ठपका पोलिसांनी त्याच्या घरातील तिघांवर ठेवला आहे.