

तारळे : दैनंदिन हजारो प्रवाशांच्या रहदारीचा रस्ता किती दुर्लक्षित असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सासपडे-नागठाणे रस्ता. गेली अनेक वर्षे प्रवाशांचा मूलभूत हक्क अक्षरशः पायदळी तुडवण्यात येत आहे. रस्त्यावर जागोजागी भले मोठे खड्डे पडले असू पावसाळ्यापूर्वी ते खड्डे भरून घेणे गरजेचे होते, पण अधिकार्यांचे दुर्लक्ष आता प्रवाशांच्या जीवावर उठले आहे. असंवेदनशीलता दाखवत प्रवाशाचा जीव जाण्याची वाट अधिकारी बघत आहेत का, अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
नागठाणे ता.सातारा येथील कण्हेर पाटबंधारे कार्यालय परिसरात मुख्य रस्ता भल्या मोठ्या खड्ड्यात रुतून बसला आहे. खड्डयांना तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे हजारो प्रवाशांची वर्दळ असणार्या या ठिकाणी किरकोळ अपघात घडत असून महाकाय खड्ड्यांच्या रूपाने येथे मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्याबाबत गंधारीची भूमिका घेतली असून त्यांच्याबाबत संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. दिवसेंदिवस ते खड्डे वाढत असून अपघाताचा धोकाही वाढत चालला आहे.
तारळे - नागठाणे हा पाटण व सातारा तालुक्यातील लोकांसाठी प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याने पाटण तालुक्यातील तारळे विभागासह सातारा तालुक्यातील सासपडे, करंजोशी, गणेशवाडी व नागठाणे येथील नविन वसाहत व शेतकरी रहदारी करत असतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार व अन्य कारणासाठी दररोज हजारो प्रवाशांची दुचाकी, चारचाकी, एसटी व अन्य वाहनांची अहोरात्र वर्दळ बघायला मिळते.
गेली अनेक वर्ष सासपडे-नागठाणे दरम्यानचा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता दर्जेदार न करता तो सोन्याचं अंड देणारी कोंबडी बनला असल्यामुळे दिवसेंदिवस खड्ड्यात रुतून पडला आहे. प्रवाशी प्रवास करताना तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करत आहेत. दोन वर्षांपूर्वी सासपडे गाव व गणेशवाडी परिसरातील काही अंतराचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले आहे. त्यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जागरूखता दाखवल्याने कित्येक वर्षानंतर रस्त्याला दर्जेदार काम काय असते हे समजले. पण अजून बराच रस्ता नूतनिकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
सासपडे गावातून जाणारा रस्ता, खडवीचा शिवार व मातोश्री मंगल कार्यालय ते नागठाणे पर्यंतच्या रस्त्यावरून प्रवास करताना चालकासह प्रवाशांना भर पावसात घाम फोडत आहे. या सर्व ठिकाणी लहान मोठ्या खडड्यांचे साम्राज्य पसरले आहे. एक खड्डा चुकवला की दुसर्या खड्ड्यात चाक आपटत आहे. कोहिनुर मंगल कार्यालय,नर्सरी,वरद मंगल कार्यालय, कण्हेर पाटबंधारे कार्यालय, बेघर वस्ती ते राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी खडड्यांचे साम्राज्य आहे.