

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत घडलेल्या रक्तरंजित सत्ता नाट्याच्या घडामोडीनंतर अभूतपूर्व संशयकल्लोळात झालेल्या सातारा - सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयापर्यंत पोहोचवणारी हक्काची मते नसतानाही महायुतीची मते फोडत ‘सिंह’ लढला, भलेही पडला! अनेक वर्षे आमदारकीसाठी कधी पक्षीय तर कधी अंतर्गत संघर्ष करत धिराने राजकारण करणारे ‘धैर्य’ अखेर जिंकले. महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांचा पराभव करत भाजप प्रणित महायुतीच्या धैर्यशील कदम यांनी सातारा - सांगलीतून थेट विधानपरिषदेत ‘कदमताल’ केली आहे. या निवडणुकीने पहिल्यांदाच काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले आहे.
एकदातरी आमदार व्हायचे या निश्चयाने पछाडलेल्या धैर्यशील कदम यांनी लक्ष्मणराव पाटील यांना नेता मानून राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रियाशील कार्यकर्ता म्हणून राजकारणात उडी घेतली. पंचायत समिती सदस्य, पत्नीला खटाव पंचायत समितीचे सभापतिपद, जिल्हा परिषदेचे सदस्यपद एवढी मर्यादितच कदमांची उडी होती. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर धैर्यशील कदम यांच्यातील कार्यकर्त्याला ‘कुछ बडा करेंगे’ असे वाटू लागले. राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून शिवसेनेत, शिवसेनेतून भाजपात अशी त्यांची मॅरेथॉन सुरू राहिली. उत्तरेतून दोनदा विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर धैर्यशील कदम यांच्या नशिबी अपयशच आले; पण गडी हटला नाही.
एकीकडे वर्धन कारखान्याची जबाबदारी तर दुसरीकडे भाजपमध्ये सक्रिय झाल्यानंतर मिळू लागलेली संधी यामुळे धैर्यशील कदम यांच्या स्वप्नांना धुमारी फुटली. भाजपचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर धैर्यशील कदम यांचा वारू चौखुर उधळू लागला. अचानकपणे सातारा लोकसभेसाठीही धैर्यशील कदम यांचे नाव चर्चेत आले; पण ते नंतर मागे पडले. पक्ष संघटनेच्या माध्यमातून कदम यांनी लोकसभा व विधानसभेला जिल्हा पिंजून काढला. नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये व पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत धैर्यशील कदम यांनी निवडणूक प्रमुख म्हणून बजावलेली भूमिका त्यांना सातारा - सांगली विधानपरिषद मतदारसंघाची उमेदवारी देण्यात महत्त्वपूर्ण ठरली.
शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे यांनी केलेले प्रयत्न फलद्रुप ठरले. तिकीट जरी मिळाले तरी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेले रक्तरंजित नाट्य धैर्यशील कदम यांच्या अंगाशी येणार होते. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने धैर्यशील कदमांच्या प्रचारात लक्ष घातले नव्हते. या दोन्ही पक्षांशिवाय कदम निवडून येणे अशक्य होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतरच राष्ट्रवादी व सेना कदमांसाठी मैदानात उतरली. तोपर्यंत धैर्यशील कदम यांचे धैर्य गळण्याची वेळ आली होती.
दुसर्या बाजूने निवडणुकांचा फार मोठा अनुभव नसतानाही नवख्या अभयसिंह जगताप यांनी महासत्तेला टक्कर देण्याचे धाडस दाखवले. मतांची बेरीज हातात नसताना अभिमन्यूप्रमाणे अभयसिंहांनी या चक्रव्युहात उडी घेतली होती. विधानसभेच्या अधिवेशनात ‘अजून अंग ठणकतंय’ असे सांगत स्वाभिमानाचा नारा देणार्या सेना राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मतदार कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे निघालेले रक्त, झालेली फरफट, फाटलेले कपडे याचा हिशेब करतील अशी भाबडी आशा अभयसिंहांना होती. मात्र, भाषणांमध्ये दाखवला गेलेला स्वाभिमान, उट्टे काढण्याची केलेली भाषा, प्रत्यक्षात ‘माल’ हातात आल्यावर कृतीत उतरली नाही. त्यामुळे मोडलेल्या करंगळीचे व झालेल्या हिसकाहिसकीचे सोयरसुतक कार्यकर्त्यांना नव्हते, असेच निकालातून स्पष्ट झाले.
जयंतराव पाटील, शशिकांत शिंदे यांच्या पाठिंब्यावर अभयसिंहांनी जवळपास १०० मते फोडत महायुतीला घाम फोडला. एकाकी सिंह बलाढ्य सत्तेविरोधात लढला, भलेही पडला पण निवडणुकीची चर्चा राज्यभर होऊन दखलपात्र झाला. दुसरीकडे सलग दोन विधानसभांमध्ये झालेल्या पराभवानंतर कराड उत्तरमध्ये योग्यवेळी थांबण्याची दाखवलेली तयारी त्यातून निर्माण झालेला धिरोदात्तपणा यामुळे कदमांमध्ये धैर्य वाढले, ते नेटाने लढले. उदयनराजे, शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, आ. मनोजदादा घोरपडे, आ. अतुल भोसले, आ. महेश शिंदे यांनी प्रामाणिक साथ दिली. तर मकरंदआबा व शंभूराज देसाई यांनी झाले गेले कृष्णेत बुडवून युती धर्म पाळला. त्यामुळे सातारा सांगलीतून थेट विधानपरिषदेत धैर्यशील यांची कदमताल सुरू झाली आहे. कार्यकर्त्याचा पिंड असलेला गडी एकदाचा आमदार झाला!