Satara-Sangli Legislative Council election: धैर्यशील कदम की अभयसिंह जगताप? आज फैसला

सातारा, सांगली जिल्ह्याचे निकालाकडे लक्ष : महायुती एकसंध की जिल्हा परिषद संघर्षाचे उट्टे?
Satara-Sangli Legislative Council election
Satara-Sangli Legislative Council election
Published on
Updated on

सातारा : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार असून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यापैकी कोण बाजी मारणार, याकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी कदम यांना जाहीर पाठिंबा दिल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. त्यामुळे महायुतीचे सूत खरोखरच जुळले होते का, की जिल्हा परिषद सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाराजीची मते फुटली, याचे उत्तर मतमोजणीत मिळणार आहे.

मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला होता, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला उमेदवारी दिली होती. भाजपने कदम यांच्यावर विश्वास टाकला, तर महाविकास आघाडीने जगताप यांना उमेदवारी दिली. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी झाली. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी सभा, बैठका आणि मतदार संपर्कावर भर दिला. जगताप यांनी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील नाराज सदस्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा परिषद सत्तास्थापनेवेळी झालेल्या संघर्षामुळे भाजपविरोधी भावना काही सदस्यांमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला होता. दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीने कदम यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. पक्षाचे सर्व मतदार एकसंध राहावेत, यासाठी विशेष नियोजन केले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदारांशी थेट संपर्क ठेवला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला.

भाजपबाबत नाराजी व्यक्त करणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर कदम यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठका घेतल्या. या चर्चेनंतर त्यांनीही महायुती धर्म पाळत कदम यांना पाठिंबा जाहीर केला. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, उदयसिंह पाटील-उंडाळकर, सुनील माने आदी नेत्यांनी समर्थक सदस्यांची समजूत काढत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न केले; मात्र या सूचनांचे किती पालन झाले आणि मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात कोणाला पसंती दिली, याचे चित्र उद्या स्पष्ट होईल.

दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले असले, तरी निकालातूनच मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष सांगली येथे होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news