Satara News : साखरवाडीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून ‘चायनीज मांजा’

साऊंड सिस्टीम लावून वाजतगाजत पतंगबाजी
nylon manjha crackdown
नायलाॅन मांजा file photo
Published on
Updated on

साखरवाडी : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चायनीज व नायलॉन मांज्यावर प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही साखरवाडी परिसरात त्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, साऊंड सिस्टीम लावून वाजतगाजत बंदी असलेल्या मांज्याने पतंग उडवण्यात आल्याचे दिसून आले. या घातक मांज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या जीवाला धोका निर्माण झाला; मात्र प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.

साखरवाडी बाजारपेठेतून एक दुचाकीस्वार जात असताना अचानक रस्त्यावर आलेला बारीक मांजा त्याच्या दुचाकीसमोर आला. वेळीच मांजा लक्षात आल्याने त्याने सावधपणे दुचाकी थांबवली. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. त्यानंतर संबंधित नागरिकाने रस्त्यावर पडलेला मांजा स्वतः काढून बाजूला केला. या घटनेचा फोटोही समोर आला असून, बंदी असतानाही घातक मांज्याचा वापर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. चायनीज व नायलॉन मांजा अत्यंत बारीक आणि धारदार असल्याने दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्ष्यांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. विशेषतः गर्दीच्या बाजारपेठांमध्ये रस्त्यावर पडलेला किंवा विजेच्या तारांमध्ये अडकलेला मांजा वाहनचालकांच्या गळ्याला अथवा शरीराला लागल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदी असलेल्या मांज्याचा वापर हा केवळ पतंग उडवण्याचा विषय न राहता सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे.

चायनीज व नायलॉन मांज्याची विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी असतानाही तो साखरवाडी परिसरात उपलब्ध होत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजतगाजत नायलॉन मांज्याचा वापर सुरू असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

साखरवाडी परिसरातील दुकाने व बाजारपेठेत तपासणी करून बंदी असलेल्या मांज्याची विक्री करणाऱ्यांवर तसेच त्याचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घातक मांज्याची विक्री व वापर पूर्णपणे थांबवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news