

सातारा : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू आणि जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी जाऊन भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत. सदाशिवराव सपकाळ ना. शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या सोबत सपकाळ यांनी ही भेट घेतली. या भेटीप्रसंगी ना. शिंदे आणि सपकाळ यांच्यात बराच काळ चर्चा झाली. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सदाशिव सपकाळ यांनी 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जावलीतून विजयी होऊन पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला खाते खोलून दिले होते. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून सदाशिव सपकाळ यांचे नाव घेतले जाते. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर सपकाळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. मात्र, आता ते शिंदे गटात प्रवेशासाठी तयार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीने जावली तालुक्याच्या राजकारणात वळण आणलं आहे. उध्दव ठाकरेंना धक्केदेण्याचे काम ना. एकनाथ शिंदे करत आहेत. सदाशिव सपकाळ यांना पक्षात घेऊन उध्दव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी त्यांनी केलेली दिसते.