

सातारा : सातारा पालिकेच्या कारभारातील दुटप्पीपणा आता चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे समर्थ मंदिर ते बोगदा चौक मार्गाच्या रुंदीकरणासाठी गोरगरीबांची घरे पाडली, शाहूपुरीत सामान्यांच्या दुकानांवर बुलडोझर फिरवला. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद चौक ते सदरबझार (करिआप्पा चौक) या प्रचंड वर्दळीच्या मार्गाचे रुंदीकरण करताना काही धनदांडग्यांना वाचवण्यासाठी आराखड्यातील १८ मीटरचा रस्ता चक्क १४ मीटरवर आणण्याचा घाट घातला जात आहे. रस्त्याची रुंदी तब्बल ४ मीटरने कमी करण्याचा डाव काही नगरसेवकांनी आखल्याने सातारा पालिकेत खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद चौक-कॅनॉल-करिआप्पा चौक-जरंडेश्वर नाका हा सातार्यातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीने गजबजलेला मार्ग आहे. गोडोली, शाहूनगर, विसावा नाका परिसर, विलासपूर या दाट लोकवस्तीच्या परिसराला सदरबझारशी जोडणारा हा सर्वात नजिकचा मुख्य मार्ग आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, हॉस्पिटल्स ही जिल्हा परिषद चौक परिसरात असल्यामुळे या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक व विद्यार्थी ये-जा करतात. भविष्याचा विचार करून या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सातारा पालिकेने हा रस्ता १८ मीटर रुंद करण्याची तरतूद विकास आराखड्यात केली. या रस्त्याचे लवकरच १८ मीटरने रुंदीकरण सुरू होणार आहे. त्यामध्ये काहींच्या संरक्षक भिंती जाणार आहेत. त्यामुळे सातारा पालिकेच्या माध्यमातून काही धनदांडग्यांनी सुप्त विरोध सुरू केला असून हा रस्ता १४ मीटरवर आणण्याचा डाव काही नगरसेवकांनी आखला असल्याची जोरदार चर्चा पालिकेत आहे.
सातारा पालिकेत काही नगरसेवकांच्या पातळीवर खालच्या खाली घोळ घालण्याचे उद्योग सुरू आहेत. मात्र सातार्याचे दोन्ही राजे कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत किंबहुना कुणाच्याही बाबतीत दुजाभाव करणार नाहीत, असा सातारकरांना विश्वास आहे. मात्र काही नगरसेवकांच्या पातळीवर सुरू असलेल्या या घोळाला आवर घालावा, अशी मागणी होत आहे.