

सातारा : मराठ्यांची चौथी राजधानी शाहूनगरीत शाही दसरा सोहळा राज्यातील पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. छ. शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर येथे भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भवानी तलवारीची मिरवणूक काढून शिवतीर्थावर महाआरती करण्यात आली. विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला.
सातार्यात छत्रपतींची राजगादी असल्याने जिल्हावासीयांना येथील शाही दसर्याचे विशेष आकर्षण असते. मात्र, यावर्षी राज्यावर पुराचे संकट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर शाही दसरा कार्यक्रम रद्द करून तो निधी पूरग्रस्तांसाठी वळवण्यात आला. त्यामुळे राजधानीतील शाही दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर येथे भवानी तलवारीचे विधिवत पूजन करण्यात आले. पोलिसांच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. शिंग-तुतार्या, ढोल-ताशांच्या गजरात
मिरवणूक काढून पोवई नाका येथे आल्यानंतर शिवतिर्थावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. ही मिरवणूक पुन्हा जलमंदिर येथे आल्यानंतर सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व श्री. छ. दमयंतीराजे भोसले यांनी दसर्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या.