

सातारा : सातारा शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. भविष्यकाळात सर्व रस्ते जर्मन टेक्नॉलॉजीयुक्त करून सातार्यातील रस्ते राज्याला पायलेट प्रोजेक्ट ठरतील, त्यादृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
सातारा शहरातील जुना आरटीओ चौक ते सुभाषचंद्र बोस चौक रस्ता सातारा नगरपरिषद, सातारा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत काँक्रिटीकरण करण्यासाठी 8,20,70,785 रुपये मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याचे काम देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि या कंपनीने पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिंद्रे, अरुण देसाई, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, विजय देसाई, दीपक पाटील, संतोष शेडगे, हेमंत आपटे, सुभाष ओंबळे, शकील सय्यद, भंडारी शेठ, डॉ. श्रोते, सुरेश जाधव, सुनील झंवर, राम हादगे, प्रदीप शिंदे, दीपक शिंदे, सुनील जाधव व नागरिक उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, महाराष्ट्रातील पहिला जर्मन टेक्नॉलॉजीयुक्त म्युझिकल रोड सातारा येथे करावा, अशी माझी संकल्पना होती. त्या संकल्पनेनुसार सातारा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक हा मार्ग जर्मन टेक्नॉलॉजी युक्त महाराष्ट्रातील पहिला म्युझिकल रोड साकारण्यात आला. हा रस्ता साकारताना युटीलिटी या संकल्पनेचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक, टेलिफोन, गॅस पाईप अथवा पाईपलाईन रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी रस्ता खोदावा लागणार नाही. जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे रस्ता खाली खचण्याचे प्रमाण अगदी नगण्य असे आहे. सुमारे 50 वर्षे टिकेल अशा पद्धतीने या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा रस्ता महाराष्ट्रातील पहिला म्युझिकल रोड ठरला असून रस्त्यावरील डेकोरेटिव्ह लॅम्पवर स्पीकर बसवण्यात आले आहेत. पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणार्या सातारकरांना भक्ती संगीताची पर्वणी यानिमित्त लाभणार आहे. सातारकरांना एक नवीन आणि अध्यात्मिक अनुभव मिळणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक हा मार्ग पूर्वी अत्यंत खराब होता. या मार्गावरून वाहन चालवताना चालकांना अत्यंत कसरत करावी लागत होती. आता मात्र या रस्त्याचे रूपडे पालटले असून भविष्यात सातार्यातील जवळपास सर्वच रस्ते जर्मन टेक्नॉलॉजीयुक्त करण्याचा मानस असल्याचेही ना. शिवेंद्रराजेंनी सांगितले.