

कोडोली : सातारा शहरालगतच्या गोळीबार मैदान परिसरातील स्वराज्यनगरमध्ये अचानक गटाराच्या वाहत्या पाण्यात प्रचंड प्रमाणात फेस दिसून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अज्ञाताने केमिकल गटारात टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
गोळीबार मैदान चौक ते स्वराज्यनगर दरम्यान गटाराच्या वाहत्या पाण्यात फेस निर्माण झाल्याची वार्ता सर्वत्र पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रारंभी नक्की काय प्रकार आहे, हे कोणालाच समजत नव्हते. त्यामुळे विविध तर्क-वितर्क लढवले गेले. गटाराच्या वाहत्या पाण्यात प्रचंड प्रमाणात फेस निर्माण झाल्याने वार्यामळे तो हवेतही उडू लागला होता. या प्रकाराने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.
या घटनेची माहिती या भागातील समाजसेवक रवी पवार यांनी नगरपालिका प्रशासनास व सातारा शहर पोलिसांना कळवली. पाहणीमध्ये संबंधित गटारामध्ये कोणीतरी रासायनिक केमिकल ओतल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही तासानंतर गटारातील केमिकलचा प्रभाव कमी झाल्याने फेसाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.