

वडूज : भोसरे, ता. खटाव येथे पिकअपची दुचाकीला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात लोणी येथील युवक ठार झाला, तर दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला आहे. सूरज भानुदास जाधव (वय,25, रा. लोणी, ता. खटाव) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर नितीन भाऊसाहेब पवार (32, रा. निमसोड, ता. खटाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूरज जाधव हा आपले चुलत सासरे नितीन पवार यांना दुचाकीवरून रात्री 9 वाजता घेऊन चौकीचा आंबा येथून लोणीकडे निघाला होता. भोसरे येथे त्यांच्या दुचाकीला पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात सूरज जाधव गंभीर जखमी झाला. त्याला वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले चुलत सासरे नितीन पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत सुनील कैलास जाधव (रा. लोणी) यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूरज जाधव याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. एकुलत्या एक कष्टाळू, कर्तबगार मुलाचे अपघाती निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.