

कोपर्डे हवेली : वातावरणातील सततच्या बदलांमुळे भात पिकावर बुरशी रोगाचा आणि आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा अनियमित पाऊस, आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे शेतकर्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. बुरशी व आळीच्या प्रादुर्भावामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
कराड तालुक्यात ऊस पिकानंतर मोठ्या प्रमाणावर भाताचे उत्पादन घेतले जाते. कोपर्डे हवेली परिसरातील भाताचा सुगंध तर सातासमुद्रापार गेला आहे. मात्र, यावर्षी वातावरणातील सततच्या बदलांचा परिणाम भात पिकावर होताना दिसून येत आहे. किड रोगाचा प्रादुर्भाव झालेले भाताचे पिक जगवताना आणि वाढवताना शेतकर्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकर्यांना बुरशीनाशके आणि किटनाशकांची फवारणी करावी लागत आहे. मात्र, फवारणीचा खर्च आणि मजुरीमुळे शेतकर्यांवर जादा आर्थिक भार पडत आहे. सध्या किड व रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने अनेक ठिकाणी भाताचे पिक पिवळे पडू लागले आहे.
भात पिकावरील किड रोगाचा बंदोबस्त करत असताना कृषी तज्ज्ञांनी शेतकर्यांना योग्य वेळी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, पिकांचे नियमित निरीक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक कृषी विभागानेही शेतकर्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
शेतकर्यांनी प्रशासनाकडून तातडीने मदत आणि परवडणार्या दरात बुरशीनाशके व किटनाशके उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पिकांचे नुकसान टाळता येईल आणि शेतकर्यांचे होणारे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल.