Satara News: सातार्‍यात आरक्षणाने दिग्गजांना बसवले घरी

लेवे, राजेशिर्के, आंबेकर, शिंदे, बर्गे यांचे प्रभाग आरक्षित
Satara Politics |
Satara News: सातार्‍यात आरक्षणाने दिग्गजांना बसवले घरीFile Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा नगरपालिकेच्या प्रभागातील नगरसेवकपदासाठी झालेल्या आरक्षण सोडतीत दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, सुहास राजेशिर्के, नगरसेवक वसंत लेवे, श्रीकांत आंबेकर तसेच संग्राम बर्गे, सागर भोसले यांचे प्रभाग आरक्षित झाले. प्रभाग आरक्षित झाल्याने मोठा फटका सातारा विकास आघाडीला बसल्याचे सोडतीनंतर स्पष्ट झाले. तर नगर विकास आघाडीच्याही काही दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना फटका बसणार आहे. एकाच प्रभागात अनेक इच्छुक असल्याने साविआ-नविआमध्ये संषर्घ उफाळणार आहे.

सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सातार्‍यातील नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. सातार्‍याची हद्दवाढ झाल्याने 4 प्रभाग व लोकसंख्या वाढल्याने 1 प्रभाग वाढला आहे. या बदलामुळे सातार्‍यातील प्रभागांची पुनर्रचना झाली. त्यामुळे अनेकांचे वॉर्ड फुटून इतर वॉर्डात विभागले गेले. नगरसेवकांचे कार्यक्षेत्र मूळ वॉर्डात तर राहते घर दुसर्‍या वॉर्डात अशी परिस्थिती निर्माण झाली. काही वॉर्डच्या तर ठिकर्‍या होऊन चार-चार वॉर्डमध्ये विभागाला गेल्याने अनेकांची कोंडी झाली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रभाग रचनेत यावेळीही काहीच बदल झाला नाही.

मात्र, ही प्रभाग रचना स्वीकारून अनेक इच्छुक उमेदवारांनी कामाला सुरूवात केली होती. गेली चार वर्षे संबंधित प्रभागांमध्ये अनेकांनी चांगली कामे केली. निवडणूक लांबणीवर पडल्याने काहीजणांनी अंदाज घेत बेताने काम केले.

सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रभाग रचना अंतिम करून काढण्यात आलेल्या 25 प्रभागांमधील 50 नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. कामे करूनही प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. प्रभाग क्र. 1 आणि 2 आणि 3 चा काही भाग हद्दवाढीने समाविष्ट झाला आहे. या प्रभागांतून अनेक नवे चेहरे इच्छुक आहेत. प्रभाग क्र. 3 मधून तृप्ती काकडे व माजी नगरसेविका भारती सोलंकी, रेणू येळगावकर यांची नावे चर्चेत आहेत.

प्रभाग क्र. 4 हा अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून नगरसेवक निशांत पाटील की नगरसेविका स्नेहा नलवडे लढणार हा तिढा निर्माण झाला आहे. शिवाय माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे व माजी नगरसेविका सुवर्णा पाटील, विजय देसाई हेही याच प्रभागातून इच्छुक असल्याने गुंता वाढला आहे.

प्रभाग क्र. 5 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून या प्रभागातून शिवानी कळसकर, विजय देसाई तसेच माजी नगरसेवक महेश जगताप हे इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. 6 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण असे आरक्षण पडल्याने नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे यांचा पत्ता कट झाला. फरांदे हे सर्वसाधारण प्रभागातून नशीब आजमावू शकतात पण नगरसेविका लता पवार तसेच माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले हेही इच्छुक असल्यामुळे अडचणी निर्माण होणार आहेत.

प्रभाग क्र. 7 हा सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची अडचण झाली आहे. पण ते याच प्रभागातील सर्वसाधारण जागेवरून लढू शकतात.

प्रभाग क्र. 8 मध्ये अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण असे आरक्षण पडल्याने साविआतून इच्छुक असलेले रवी माने यांची डोकदुखी वाढली आहे. या प्रभागातून राहूल यादव इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. 9 व प्रभाग क्र. 10 मधूनही अनेक इच्छुक आहेत. प्रभाग क्र. 11 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या प्रभागातून माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. 12 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडल्याने माजी उपनगराराध्यक्ष किशोर शिंदे यांची अडचण झाली आहे. तसेच या प्रभागातून इच्छुक असलेले माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांचीही कोंडी झाली.

प्रभाग क्र. 13 मध्ये अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण असे आरक्षण पडल्याने नगरसेवक बाळू खंदारे अडचणीत आले आहेत. मात्र ते सर्वसाधारण या जागेवरून लढू शकतात. तसे झाले तर नगरसेविका दिपलक्ष्मी नाईक यांचा पत्ता कट होऊ शकतो. याच प्रभागातून माजी नगरसेविका हेमा तपासे, सावित्री बडेकर, वसंत जोशी, आप्पा कोरे व सोनिया शिंदे हेही इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. 14 मध्ये सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. या प्रभागातून माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके, माजी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, नगरसेवक अल्लाउद्दीन शेख हे इच्छुक असल्यामुळे ट्विस्ट निर्माण झाले आहे. हे सर्वजण एकाच प्रभागात आल्यामुळे तिकीट देताना नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्र. 15 मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडल्याने पुरूष इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. नगरसेविका अनिता घोरपडे इच्छुक आहेत. मात्र या प्रभागातून माजी नगरसेविका स्वाती आंबेकर याही दावेदार मानल्या जात असल्याने साविआत ट्विस्ट निर्माण होणार आहे.

प्रभाग क्र. 16 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला) यासाठी राखीव असून वैभव पोतदार हे इच्छुक आहेत. याच प्रभागातून इच्छुक असलेले शिवसेनेचे (शिंदे गट) संभाजी पाटील यांचा पत्ता कट झाला.

प्रभाग क्र. 17 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे संग्राम बर्गे यांचा पत्ता कट झाला. या प्रभागात नविआतून फिरोज पठाण इच्छुक असून त्यांचा मार्ग सुकर झाला आहे.

प्रभाग क्र. 18 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर हे अडचणीत आले आहेत. सर्वसाधारण या प्रवर्गातून नगरसेवक शेखर मोेरे पाटील इच्छुक असले तरी या प्रवर्गातून अ‍ॅड. डी. जी. बनकर हेही लढू शकतात.

प्रभाग क्र. 19 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडल्याने इच्छुक सागर भोसले यांचा पत्ता कट झाला. मात्र सागर भोसले यांच्या पत्नी येथून निवडणूक लढू शकतात. तर नविआतून निखिल माळी, सुशांत महाजन यांनीही दावा केला आहे.

प्रभाग क्र. 20 चे सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. या प्रभागातून श्रीमंत वृषालीराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, माजी नगरसेवक प्रशांत आहेरराव व सागर पावशे हेही या प्रभागातून इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. 21 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडले असून या प्रभागातून विरोधी पक्षनेते अशोक मोने व माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक आणि किशोर पंडित, धनंजय पाटील इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. 23 व 24 मध्ये जांगडगुत्ता झाला आहे. प्रभाग क्र. 23 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे नगरसेवक वसंत लेवे यांची अडचण झाली आहे. तर प्रभाग क्र. 24 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. या दोन्ही प्रभागांवर नगरसेवक रवींद्र ढोणे व नगरसेवक वसंत लेवे यांचे वर्चस्व आहे. मात्र, आरक्षणे ही उलटी सुलटी पडल्याने ट्विस्ट निर्माण झाला आहे. ढोणे यांच्यासमोर सर्वसाधारण प्रवर्गातून लढण्याचा पर्याय आहे. मात्र लेवे यांच्यासमोर तोही पर्याय नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नविआचे रवी माने यांच्यापुढेही प्रश्न आहे.

प्रभाग क्र. 25 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यावेळीही नशिबाने साथ न दिल्याने माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचा पत्ता कापला गेला आहे. या प्रभागातून माजी नगराध्यक्षा रंजना रावत तसेच राजू गोरे इच्छुक आहेत.

दरम्यान, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर नागरिकांचा मागास प्रवर्गांत (महिला) आरक्षण पडल्याने या जागांवरून लढू इच्छिणार्‍यांनी सर्वसाधारण प्रवर्गाचा पर्याय शोधला आहे. मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढू पाहणार्‍यांच्या नशिबी महिला आरक्षण आल्याने त्यांचे पत्ते कट झाल्याचे चित्र आहे. काही उमेदवारांवर प्रभाग बदलण्याची वेळ येऊ शकते. प्रभागांची पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीने अनेक दिग्गजांना घरी बसवावे लागले आहे.

सातार्‍यात आरक्षण सोडतीनंतर तणाव

सातार्‍यात काही वर्षांपासून सातारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडी तसेच नगर विकास आघाडीतील काही इच्छुकांमध्ये संषर्घ सुरू आहे. प्रभागातील नगरसेवकपदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी उट्टे काढण्याचा प्रयत्न झाला. विलासपूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीनंतर साविआ गटाकडून फटाके फोडण्यात आले होते. त्यानंतर नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीनंतर नविआ गटाने गुलाल उधळला. त्यामुळे विलासपूरमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण होते.

भाजपसमोर ट्विस्ट, एकाच प्रभागात चार नगरसेवक

प्रभाग क्र. 22 मध्ये सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. या प्रभागातून नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक विजय काटवटे, नगरसेविका सिद्धी पवार, नगरसेविका प्राची शहाणे इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत हे विद्यमान नगरसेवक भाजपमधून निवडून आलेले. आता हे सर्वजण एकाच प्रभागात आल्याने भाजपसमोर ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यातच माजी नगराध्यक्षा रंजना रावत, संपत जाधव, राजू गोडसे, दीपाली गोडसे, केदार राजेशिर्के, हर्षल चिकणे, गजेंद्र ढोणे, चंदन घोडके, बाळासाहेब शिंदे, नाना इंदलकर हेही इच्छुक असल्याने तगडी फाईट होईल.

नगरसेवकपदाचे पत्ते कट, पण नगराध्यक्षपदी संधी

आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांची कोेंडी झाली असली तरी नगराध्यक्षपदी त्यांना संधी आहे. साविआतून माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, संग्राम बर्गे, नगरसेवक वसंत लेवे तर नविआतून माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांची नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. हे तगडे उमेदवार नगराध्यक्षपदाचे दावेदार होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news