

सातारा : सातारा जिल्ह्यात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ६६.९२ तर शिक्षक मतदारसंघासाठी ८९.३९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी मतपेट्या बालेवाडीकडे (पुणे) बंदोबस्तात रवाना झाल्या.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. २३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानासाठी मतदारांना बाहेर काढण्यासाठी पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सकाळपासून सक्रिय होते. मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बर्याच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक मतदान केंद्रांवर सकाळपासून दुपारपर्यंत गर्दी दिसत होती. मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
सातारा जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४ तर पदवीधर मतदारसंघासाठी ९३ मतदान केंद्रे होती. जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी ९ हजार ४५४ मतदारांपैकी सुमारे ८ हजार ४५१ मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात ८९.३९ टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघासाठी ४७ हजार ४६३ मतदारांपैकी सुमारे ३१ हजार ७६४ मतदारांनी हक्क बजावला. या मतदारसंघात ६६.९२ टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पहायला मिळाली. मतदान केंद्रावर असलेल्या सर्व मतदारांचे मतदान करून घेण्यात आले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाकडे बंदोबस्तात रवाना झाल्या. बालेवाडी येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणी याच ठिकाणी दि. २७ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून होणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. निवडणूक पथके नियुक्त करण्यात आली होती. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मतदान केंद्रांना आवर्जून भेटी देत पाहणी केली. मतदान प्रक्रियेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यात अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांच्याकडूनही मतदान केंद्रांना भेटी देण्यात आल्या. पोलिस यंत्रणा दिवसभर सतर्क होती.
पुणे शिक्षक मतदारसंघात सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय मतदान झाले. १ हजार ३ मतदारांनी मतदान केले नसले तरी तब्बल ८ हजार ४५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राजकीय पक्षांनी वैयक्तिक पातळीवर मतदारांशी संपर्क साधल्याने तसेच संघटनात्मक व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबवलेली प्रभावी मतदार जनजागृती मोहीम यांचा मतदान वाढीत मोलाचा वाटा राहिल्याचे दिसून येते.