Chhatrapati Shahu Maharaj Portrait: थोरल्या छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ राजप्रतिमा उजेडात

राजवेशातील पूर्णाकृती चित्रातून उलगडले राजवैभवाचे अनोखे रूप
Chhatrapati Shahu Maharaj Portrait
Chhatrapati Shahu Maharaj Portrait: थोरल्या छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ राजप्रतिमा उजेडात
Published on
Updated on
विशाल गुजर

सातारा : मराठा साम्राज्याच्या इतिहासात साताऱ्याला राजधानीचे वैभव प्राप्त करून देणारे आणि आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मराठा सत्तेचा विस्तार दिल्लीपासून दक्षिणेपर्यंत घडवून आणणारे थोरले छत्रपती शाहू महाराज यांची राजवेशातील पूर्णाकृती आणि दुर्मिळ राजप्रतिमा प्रथमच प्रकाशात आली आहे.

महाराजांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी साकारण्यात आलेले हे चित्र त्यांच्या समकालीन व्यक्तिचित्रणापेक्षा वेगळे असले, तरी पुढील पिढ्यांनी शाहू महाराज यांच्याविषयी जपलेला आदर, त्यांच्या राजवैभवाची कल्पना आणि ऐतिहासिक स्मृती यांचे प्रभावी दृश्यरूप म्हणून या चित्राचे महत्त्व अधोरेखित होत आहे. इतिहास अभ्यासक निलेश झोरे यांनी ही माहिती दिली.

साताऱ्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाशी अविभाज्य नाते असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे व्यक्तिमत्त्व या चित्रात प्रभावीपणे उभे राहते. हे चित्र राजधानी साताऱ्यातील इतिहास अभ्यासक निलेश झोरे यांच्यामुळे उजेडात आले आहे. ऐतिहासिक दस्तावेज हाताळताना हे चित्र त्यांच्या निदर्शनास आले. ते थोरले छत्रपती शाहू महाराज यांचेच चित्र असल्याचे दस्तावेज व अभ्यासावरून सिद्ध होत असल्याचा दावा इतिहास अभ्यासक झोरे यांनी केला आहे. हे चित्र १८व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळातील असून त्यावर सध्या आणखी संशोधन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

या चित्रामध्ये पूर्णाकृती स्वरूपात उभ्या असलेल्या महाराजांच्या मस्तकावर रत्नजडित मंदिल असून, कपाळावर स्पष्ट विष्णूनाम अंकित आहे. रुबाबदार मिशा, स्थिर नजर आणि चेहर्‍यावरील शांत, मात्र अधिकारपूर्ण भाव यातून सार्वभौम राजाचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित होते. गडद हिरवा राजवेश, खांद्यावर लाल शेला, कमरेला सुवर्ण कंबरपट्टा, गळ्यातील मोत्यांच्या माळा आणि कानातील कुंडले यामुळे चित्रातील राजेशाही दिमाख अधिक खुलून दिसतो. वस्त्रांची रचना, अलंकारांची बारकाई आणि रंगसंगतीतून तत्कालीन राजवैभवाची कल्पना चित्रकाराने प्रभावीपणे साकारली आहे.

थोरले शाहू महाराज अर्थात छत्रपती शाहूराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. त्यांचा जन्म १८ मे १६८२ रोजी रायगडाजवळ झाला. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचे ते चिरंजीव होत. रायगडवर औरंगजेबाच्या सैन्याने ताबा घेतल्यानंतर लहान वयातच शाहू महाराज मुघलांच्या कैदेत गेले. तब्बल १७ वर्षे त्यांनी मुघलांच्या कैदेत काढली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७०७ मध्ये मराठ्यांमध्ये फूट पाडण्याच्या हेतूने मुघलांनी शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. त्यानंतर त्यांनी मराठा सत्तेवरील आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. महाराणी ताराबाई यांचा पराभव करून त्यांनी सातारा गादीची सूत्रे आपल्या हाती घेतली होती.

छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासाशी संबंधित कागदपत्रे नव्याने समोर येत असून, त्यांच्या कार्याचा इतिहास अधिक व्यापकपणे उलगडत आहे. अशा वेळी राजवेशातील हे दुर्मिळ चित्र प्रकाशात येणे ही मराठा इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना आहे. इतिहास केवळ लिखित पुराव्यांवर उभा नसतो; दृश्य पुरावेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या या अप्रकाशित राजप्रतिमेमुळे मराठा इतिहासाच्या अभ्यासाला एक नवे दृश्य परिमाण प्राप्त होईल.
-निलेश झोरे, इतिहास अभ्यासक

हातातील राजदंड ठरतो सर्वाधिक लक्षवेधी...

या चित्रातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे थोरले छत्रपती शाहू महाराजांच्या हातातील राजदंड. तो केवळ सार्वभौम सत्तेचा द्योतक नसून न्याय, कर्तव्य आणि धर्मपालनाच्या राजकीय संकल्पनेचे प्रतीक म्हणूनही चित्रात अधोरेखित होतो. त्यामुळे ही प्रतिमा केवळ व्यक्तिचित्र न राहता शाहू महाराजांच्या राजसत्तेची दृश्य मांडणी ठरते. चित्रकाराने महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील राजेशाही दिमाख आणि सौंदर्य यांचा सुरेख मेळ साधला आहे. विशेषतः चेहर्‍यावरील भाव, पोशाखातील बारकावे, अलंकारांची मांडणी आणि रंगांचा वापर यामुळे चित्राला ऐतिहासिक तसेच कलात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news