

सातारा: साताऱ्यात हातगाडीवर फळविक्री करणाऱ्या फळविक्रेत्याने गाड्याचाच आडोसा घेत कॅरीबॅगमध्ये लघुशंका केली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, संशयितावर पोलिसांनी स्वत:हून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजू बादशहा बागवान (वय 68, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस दिपक पोळ यांनी तक्रार दिली आहे.
ही घटना दि. 16 मे रोजी सायंकाळी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राजू बागवान याचा फळाचा गाडा आहे. राजवाडा ते समर्थ मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॉलेजसमोर तो फळ विक्री करत आहे. त्याने तिथेच उभं राहून कॅरीबॅगमध्ये लघुशंका केली. फळ विक्रेत्याची ही कृती परिसरातील सजग नागरिकाला दिसली. या घटनेचा व्हिडीओ तयार केला. हाच व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला.
संबंधित व्हिडीओ पाहून सातारकरांचा संताप झाला. समाजमाध्यमावरील तो व्हिडीओ शाहूपुरी पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याबाबत माहिती घेतली. घटना साताऱ्यातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयिताविरुद्ध पोलिसांनी स्वत:हून तक्रार दिली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोनि संग्राम शेवाळे यांनी कारवाईची माहिती दिली. फळविक्रेत्याने गाड्याजवळच उभे राहून अश्लील कृती करत लघुशंका केली. पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला ताब्यात घेवून पोलिसांनी त्याच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिकेडूनही कारवाई
साताऱ्यात फळविक्रेत्याकडून लघुशंकेचा प्रकार झाल्याची माहिती सातारा नगरपालिकेला समजल्यानंतर त्यांनी खातरजमा केली. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम राबवत डंपर नेला. फळविक्रेत्याचे वजनकाट्यासह इतर साहित्य जप्त करत अतिक्रमण विभागाने कारवाईचा दणका दिला.