

वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर सध्या विविधरंगी रानफुलांचा बहर आला आहे. संपूर्ण पठाराने जणू रंगांची मखमली चादर पांघरली आहे. तेरडा, मिकी माऊस, सोनकी यासह विविध जातींच्या फुलांनी पठार सजले असून हा नयनरम्य नजारा पाहण्यासाठी शिवप्रेमी व निसर्गप्रेमींची पावले रायरेश्वरकडे वळू लागली आहेत.
पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये फुलणारी ही रानफुले पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. रायरेश्वर हे केवळ निसर्ग सौंदर्यासाठी नव्हे, तर ऐतिहासिक वारशासाठीही महत्त्वाचे आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. पठारावर रायरेश्वर मंदिर, जननी देवी मंदिर, सात रंगांची माती असलेली विहीर, पांडवकालीन लेणी, गोमुखकुंड, शिवकालीन पाण्याची टाकी व नाकिंदा (अस्वलखिंड) अशी विविध प्रेक्षणीय स्थळे आहेत.
पठारावरून पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड व पुरंदर या किल्ल्यांचे विहंगम दर्शन होते. सूर्योदय व सूर्यास्ताचे दृश्यही पर्यटकांसाठी आकर्षण ठरते. रायरेश्वर, केंजळगड व कमळगड या तीन किल्ल्यांची भटकंतीही एका दिवसात करता येते. वाईहून गडाच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते. तेथून सुमारे २० मिनिटांच्या चढाईनंतर पठारावर पोहोचता येते.
रायरेश्वर परिसरात सुमारे ५०० लोकसंख्या असून, त्यापैकी केवळ १५० नागरिक येथे वास्तव्यास आहेत. जंगम समाजाची सुमारे ४० कुटुंबे येथे आहेत. रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक नागरिक बाहेरगावी स्थलांतरित झाले आहेत. प्रशासनाने पर्यटनाच्या दृष्टीने मूलभूत सुविधा व नियोजनबद्ध विकास केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.