

सातारा : पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य विनियोग करण्याबरोबरच भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी पुढाकार घेवून रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण उपक्रमाला चालना देण्यात येत आहे. जिल्ह्यातील १ हजार १८२ इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जलसंवर्धनाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र, पावसाचे पाणी योग्य पध्दतीने साठवले जात नसल्याने ते वाहून जाते. दुसरीकडे अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांना टँकरवर अवलंबून रहावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब महत्वाचा मानून त्याचे संकलन करणे आवश्यक आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रभावी पर्याय ठरत आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाअंतर्गत जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला मोठे प्राधान्य देण्यात आले. या अभियानामध्ये जिल्ह्यातील गावोगावी ग्रामपंचायतीमार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे गावोगावी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. शासकीय इमारती, शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग पध्दतीमध्ये इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे एका विशिष्ट ठिकाणी जमा केले जाते. त्यानंतर फिल्टरच्या माध्यमातून पाण्यातील कचरा व गाळ वेगळा करून हे पाणी साठवण टाकीत जमा केले जाते किंवा रिचार्ज विहीर, शोषखड्डा आणि बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरले जाते. त्यामुळे पावसाचे पाणी थेट नाल्यांमध्ये वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. या उपक्रमामुळे भूजल पुनर्भरणाला चालना मिळण्याबरोबरच विहीरी, बोअरवेल आणि अन्य जलस्त्रोतांची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास मदत होवू शकते.
जलसंवर्धनासाठी ग्रामपंचायतीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पुढाकार महत्वाचा असला तरी हा उपक्रम केवळ आकडेवारीपुरता मर्यादित न राहता त्यातून प्रत्यक्ष पाणी संकलन आणि भूजल पुनर्भरण किती होते, याचेही मूल्यमापन होणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक नागरिकांने पावसाचे पाणी अडविण्याचा संकल्प केल्यास भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठा हातभार लागू शकतो.