Satara Rain: पावसाचे पुनरागमन; खरिप अंतिम टप्प्यात

८० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण; भुईमूगाच्या क्षेत्रात वाढ
Satara Rain: पावसाचे पुनरागमन; खरिप अंतिम टप्प्यात
Published on
Updated on

कराड : कराड तालुक्यात काही दिवसांची उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्याने खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात ८० टक्क्यांहून अधिक खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा भुईमूगाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे. पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेचे ढग दूर झाले असून उर्वरित पेरण्यांनाही वेग आला आहे.

यावर्षी मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाल्यामुळे जूनअखेरपर्यंत शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी आणि पेरणी ठोकण्याची कामे युद्धपातळीवर हाती घेतली. मात्र त्यानंतर तब्बल आठ दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ज्या भागात सुरुवातीला पेरण्या झाल्या होत्या, तेथे कोवळी रोपे उगवली; परंतु वाढत्या उन्हामुळे ही पिके टिकतील की नाही, अशी भीती निर्माण झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पावसाने नियमित हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने जमिनीतील ओलावा टिकून आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पिकांच्या वाढीस पोषक परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे भात, सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी तसेच इतर पिकांच्या वाढीस चालना मिळणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

यंदा तालुक्यात खरीप क्षेत्रात वाढ झाल्याने कृषी विभागाचे नियोजनही वाढले आहे. उर्वरित पेरण्या येत्या काही दिवसांत पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पुढील काळात पावसाचा नियमितपणा कायम राहणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. पावसात मोठा खंड पडल्यास नव्याने उगवलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील मान्सूनच्या हालचालींकडे लागले आहे.

सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शिवार हिरवाईने नटून गेले आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी व टोकणी झालेली पिके उगवून आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने साथ दिल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news